महापालिका निवडणुकीत माजी नगरसेवकांना धडा शिकवू - आ. सतेज पाटील
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सोडून अन्य पक्षात गेलेल्या माजी नगरसेवकांना निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांनी दिला. प्रभाग क्र. २० सुर्वेनगर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते शिवराज पाटील, विजयकुमार कांबळे आणि अनेक कार्यकर्त्यांनी आ. सतेज पाटील व माजी आ. ऋतुराज संजय पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

आ. सतेज पाटील पुढे म्हणाले, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे नाव न घेता आरोग्य विभागातील मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचारावरही निशाणा साधला. लवकरच हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा त्यांनी इरादाही व्यक्त केला. विरोधी पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने दिली जात असली तरी मतदार त्याला भुलणार नाहीत. शहर व उपनगरांना थेट पाईपलाईनद्वारे मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा करून नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्याचा त्यांनी उल्लेख केला.
माजी आ. ऋतुराज पाटील यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले.
या मेळाव्याला माजी नगरसेवक मधुकर रामाणे, राहुल माने, इंद्रजीत बोंद्रे, धीरज पाटील, तसेच कळंबा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमन गुरव यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.




