जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; उपोषण स्थगित करण्याची उदय सामंतांची मागणी
मुंबई (प्रतिनिधी) : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 12 वा दिवस असून, सरकारने त्यांच्या 12 मागण्या मान्य केल्याचं मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. मात्र, सरकारने एकही मागणी मान्य केली नसल्याचं सांगत जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर आता सरकारच्या वतीने मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू मांडली. तसेच, जरांगे पाटलांच्या भाषेवरून बोलताना, “जसे त्यांचे समर्थक आहेत, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक आहेत,” असं उदय सामंत यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मी आणि प्रसाद लाड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासन तसेच आरक्षण समितीची बैठक घेतली. आतापर्यंत मराठा समाजासाठी जे काही काम करण्यात आलं, त्यासाठी या बैठका घेण्यात आल्या. मराठवाड्यात 21 हजार 51 जात प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली असून, त्यातील 16 हजार 110 दाखले देण्यात आले आहेत. त्यामुळे पडताळणी चुकीच्या पद्धतीने होतेय, हा गैरसमज आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं.
तसेच, फक्त 2 हजार दाखले प्रलंबित असून, तेही लवकरच मिळतील. त्याचा ओबीसी समाजावर कोणताही परिणाम होणार नाही. सरकारची भूमिका स्पष्ट आहे, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. “आम्ही कुणालाही दुजाभावाची वागणूक दिलेली नाही. सरकार म्हणून आम्ही सोबत आहोत आणि अधिकारी काम करत आहेत. मनोज दादा खुश राहावेत, तसेच एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेबही आनंदी राहावेत. मनोज दादांचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे ज्या नेत्यांनी काम केलं, त्या नेत्यांबद्दल वाईट बोललं तर वाईट वाटतं,” असं म्हणत उदय सामंत यांनी जरांगे पाटलांकडून एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्यावरून आपली भूमिका मांडली.
जाणीवपूर्वक कुणीतरी जरांगे पाटील आणि सरकारमध्ये गैरसमज निर्माण करत असल्याचंही उदय सामंत यांनी म्हटलं. “संवाद गरजेचा आहे आणि आमच्या नेतृत्वाला वाईट बोलू नये, हे आम्ही संयमाने सांगतो. मनोज जरांगे पाटील यांना गैरसमज नाही, त्यांना कुणीतरी काहीतरी सांगतं आणि त्यानंतर हे होतं,” असं सामंत म्हणाले. उद्या पोळा सण आहे, मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती आहे आणि राज्यात गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे आंदोलनाला स्थगिती द्यावी, अशी विनंती उदय सामंत यांनी केली.
“जरांगे पाटील आक्रमक आहेत, तर आम्ही सरकार आहोत, मायबाप आहोत. संयम आमच्या पाचवीला पुजला आहे. आम्हाला संयमानेच बोलावं लागेल. आम्ही त्यांना अभ्यासक पाठवा, असं आवाहन केलं होतं. आता ते आले नाहीत तर काय करावं?” असा सवालही सामंत यांनी उपस्थित केला. “आम्ही चार पाऊल नाही, तर 500 किलोमीटर पुढे आलो आहोत. दंगल घडवणे हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही. हे पाप आम्ही करणार नाही, ते आमचं काम नाही. मनोज जरांगे यांनी हे डोक्यातून काढून टाकावं. उपोषणामुळे त्यांना चिडचिड होत आहे. सरकार आंदोलकांची काळजी घेतंय, तशी आंदोलकांनीही काळजी घ्यावी,” असं सामंत यांनी म्हटलं.
“जसे जरांगे यांचे समर्थक आहेत, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक आहेत ना? तेही बोलणार ना. आमच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. हे सगळे शिंदे साहेबांमुळे मंत्री झाले आहेत. माझी त्यांना सांगण्याची भाषा मी मराठीचा मंत्री असल्याने सौम्य आहे. मात्र, प्रत्येकाचं व्यक्तिस्वातंत्र्य आहे. प्रत्येकजण आपल्या भाषेत बोलू शकतो,” असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.




