मराठी भाषा शिकलीच पाहिजे; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
मुंबई (प्रतिनिधी) : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बोलता येणे आवश्यक आहे, या नियमाची १ मे या दिवसापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नियम न पाळणाऱ्यांचा परवाना रद्द होऊ शकतो. त्यांना प्रशिक्षण देण्याचीही सरकारची तयारी आहे. त्यामागे त्यांनी मराठी बीएची पदवी घ्यावी, त्यासाठी परीक्षा द्यावी अशी अपेक्षा नाही, तर त्यांना जुजबी मराठी बोलता यायला हवे आणि रोजच्या व्यवहारातील मराठी बोलणे जमले पाहिजे ही भूमिका आहे असे नुकतेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुलाखतीत स्पष्ट केले. या मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया येत असतानाच एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी रोखठोक भूमिका व्यक्त केली.

"आम्ही मराठीचे समर्थनच करतो. ज्या राज्यात आपण राहतो, त्या राज्याची भाषा आपल्याला आलीच पाहिजे. मी खास करून मुस्लिमांना गोष्ट सांगू इच्छितो की जर तुमचा मुलगा स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असेल आणि त्यानंतर त्याला सरकारी नोकरी हवी असेल, तर त्यासाठी त्यांनी मराठी शिकून घेतलीच पाहिजे. कारण अशा ठिकाणी मराठीचे ज्ञान आवश्यक असते. त्यामुळे या गोष्टीकडे कुठल्याही जाती किंवा धर्माच्या नजरेतून पाहू नये. पण जर सरकार असे म्हणत असेल की तुम्ही आठ दिवसांत मराठी बोलायला शिका अन्यथा नव्या दिवशी तुमच्यावर कारवाई केली जाईल किंवा गुंडगिरी केली जाईल, तर मात्र ते योग्य ठरणार नाही," असे अतिशय स्पष्ट मत इम्तियाज जलील यांनी मांडले.
दरम्यान, प्रताप सरनाईक यांना वारंवार असाही प्रश्न विचारला जात आहे की, रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी भाषा बोलता येण्याच्या नियमाची निकड आत्ताच का भासली? त्यावरही सरकारकडून त्यांनी उत्तर दिले आहे. "हा नियम प्रताप सरनाईक परिवहन मंत्री झाल्यानंतर केलेला नाही, तो १९८९चा नियम आहे. अनेक रिक्षाचालकांना मराठी येत नाही, ते अरेरावी करतात. प्रवासी मराठीत बोलत असूनही ते हिंदीतच बोला असे सांगतात. त्यातून भाषावाद निर्माण होतो. याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांना बॅज देताना जुजबी मराठी बोलता यायलाच हवी," असे त्यांनी स्पष्ट केले आहे.




