भाजपमध्ये घेतलेल्या नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या चौकशा का थांबल्या?; कपिल सिब्बल यांचा मोदी सरकारवर सवाल
मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी प्रकरणांवर फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची घोषणा केल्यानंतर, खासदार कपिल सिब्बल यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.सिब्बल म्हणाले, "सर्वप्रथम भाजपमध्ये सामील झालेल्या त्या नेत्यांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करा, ज्यांच्यावर यापूर्वी गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांनी स्वतः त्यांच्या भाषणांत या नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले होते. मग त्यांच्यावरील कारवाई का होत नाही? सीबीआयच्या चौकशा का थांबल्या? या प्रश्नांची उत्तरं आधी सरकारने द्यावीत.

यावेळी त्यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावरही सरकारला लक्ष्य केले. "विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना सरकार आणि पंतप्रधान शांत होते. उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची तसदीही घेतली नाही. आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव झाल्यानंतर सरकारला या विषयावर बोलावे लागत आहे," असा आरोप त्यांनी केला.
कपिल सिब्बल पुढे म्हणाले, "देशातील तरुणांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रोजगाराच्या संधी कमी आहेत, शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि परीक्षांमध्ये सातत्याने गैरप्रकार होत आहेत. २०१७ पासून अनेक भरती आणि प्रवेश परीक्षांचे पेपर फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकतेच नीट परीक्षेनंतर महाराष्ट्रातील टीईटी परीक्षेचाही पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला."
सरकारवर निशाणा साधताना सिब्बल म्हणाले, "जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सत्ताधारी पक्ष हिंदू-मुस्लिम आणि धार्मिक घोषणांच्या मुद्द्यांवरच राजकारण करत आहे," असा आरोपही त्यांनी केला.




