दिल्ली कॅपिटल्समध्ये पुनरागमन; ट्रेडमुळे ऋषभ पंतच्या मानधनात 12 कोटींची घट
आयपीएल 2027 साठी संघांची तयारी सुरू असतानाच मोठ्या ट्रेडची चर्चा रंगली आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या ट्रेडनंतर स्टार विकेटकीपर-फलंदाज Rishabh Pant पुन्हा एकदा दिल्लीच्या ताफ्यात दाखल झाला आहे. या व्यवहारात दिल्लीने पंतला आपल्या संघात घेतले असून, त्याच्या बदल्यात Kuldeep Yadav लखनौ सुपर जायंट्समध्ये सामील झाला आहे.या ट्रेडचा सर्वात मोठा परिणाम पंतच्या मानधनावर झाला आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात लखनौने त्याच्यासाठी तब्बल 27 कोटी रुपयांची बोली लावली होती, ज्यामुळे तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. मात्र, दिल्ली कॅपिटल्सने त्याला 15 कोटी रुपयांच्या ट्रेड डीलवर संघात घेतल्याने त्याच्या मानधनात 12 कोटी रुपयांची घट झाली आहे.

पंतसाठी हे दिल्ली कॅपिटल्समध्ये पुनरागमन ठरणार आहे. 2016 ते 2024 या कालावधीत त्याने दिल्लीकडून 111 सामने खेळले असून, संघासाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव अग्रस्थानी आहे. त्याने 43 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्वही केले होते.
दरम्यान, लखनौ सुपर जायंट्सकडून दोन हंगाम खेळताना पंतने 28 सामन्यांत 581 धावा केल्या. या काळात त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते. आता Rishabh Pant पुन्हा दिल्लीच्या जर्सीत मैदानात उतरताना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील.




