कागलच्या कुस्ती मैदानात कोण बाजी मारणार..?
कागल (प्रतिनिधी) - कागल येथे गहिनीनाथ गैबी पीर उरुसानिमित्त रविवार २६ ऑक्टोबर रोजी भव्य कुस्ती मैदान होणार आहे. श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना पुरस्कृत होत असलेले हे मैदान ऐतिहासिक यशवंत किल्ला, सांगाव नाका येथे होणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे यांच्यामध्ये लढत होणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकासाठी महाराष्ट्र चॅम्पियन श्रीमंत भोसले विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन हनुमंत पुरी यांच्यामध्ये लढत होणार आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे मैदान दुपारी तीन वाजता होईल.

शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून गहिनीनाथ गैबी पीर उरुसानिमित्त या कुस्ती मैदानाचे आयोजन केले जाते. त्यांच्या पश्चात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रोत्साहनातून या मैदानाचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे लोप पावत चाललेल्या कुस्ती कलेला चालना मिळत आहे. देशातील नामवंत पैलवान यांच्या लढती या मैदानात होतात. त्यामुळे या मैदानाकडे कुस्ती शौकिनांचे लक्ष लागून राहिलेले असते.
या मैदानातील अन्य प्रमुख लढती अशा आहेत. रोहन रंडे (मुरगुड) विरुद्ध प्रदीप ठाकूर (सांगली), मोहन पाटील( सांगाव) विरुद्ध अजय शेंडगे (टिटवे), ऋषिकेश पाटील (बानगे) विरुद्ध विश्वचरण सोलंकर (गंगावेश),राम कांबळे (यळगुड) विरुद्ध श्रीनाथ टिकवले( शाहूपुरी),प्रतीक म्हेतर (राशिवडे) विरुद्ध सुरज पाटील (मोतीबाग) विनायक वासकर (शाहू साखर)विरुद्ध निशांत पाटील (मोतीबाग) स्वप्नील शेंडे(शाहू साखर)विरुद्ध सचिन महागावकर( मोतीबाग) यासह नेमलेल्या इतर सव्वा दोनशेहून अधिक कुस्त्या या मैदानात होणार आहेत.




