राजस्थानमध्ये भीषण अपघात; नागपूरच्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू

राजस्थानमध्ये भीषण अपघात; नागपूरच्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कामठी (वृत्तसंस्था) : राजस्थान येथील रिंगस परिसरातील खाटु श्यामबाबा मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या कामठी येथील पारसे कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला. सालासर रोड येथे झालेल्या भीषण अपघातात आई-वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कचरीपुरा (कामठी) येथील महादेव ऋषी पारसे (५२) हे ६ मार्च रोजी त्यांच्या घराशेजारी राहणारे मनोज चिंदमवार (३५) यांच्या मालकीच्या तवेरा गाडी (एमएच २८ व्ही ५२३४) ने कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी रवाना झाले होते. त्यांच्या सोबत पत्नी कांता महादेव पारसे (४५), मुलगा घनश्याम महादेव पारसे (२२), पुतणी आराधना चंद्रभान पारसे (२६), पायल शंकर पारसे (२२), पल्लवी चंद्रभान पारसे (२१), पूनम यादव पारसे (२०), तुषार महादेव पारसे (२४) आणि पवन बागडे (२२), असे एकूण दहा जण होते.

सर्व जण ६ मार्च रोजी मध्यरात्री सुमारे बारा वाजता कामठीतून निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांनी उज्जैन येथील महाकालेश्वर येथे दर्शन घेतले. त्यानंतर बुधवारी ११ मार्च रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास ते राजस्थानातील रिंगस येथे खाटू श्यामबाबा मंदिरात दर्शनासाठी जात असताना जयपूर मार्गावरील सालासर परिसरात त्यांच्या तवेरा वाहनाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या अनियंत्रित पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत तवेरा वाहनातील सर्वजण गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ सर्वांना सालासर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महादेव ऋषी पारसे, त्यांची पत्नी कांता महादेव पारसे आणि मुलगा घनश्याम महादेव पारसे यांना मृत घोषित केले. वाहन चालक मनोज चिंदमवार यांच्यासह पारसे कुटुंबातील सहा जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती बुधवार रात्री सुमारे आठ वाजता कामठी येथे पोहोचताच कचरीपुरा परिसरात शोककळा पसरली. यानंतर महादेव पारसे यांचे नातेवाईक व सुरादेवी येथील माजी सरपंच सुनील दुधपचारे हे तातडीने सालासर रोडकडे रवाना झाले. तिघांच्या मृतदेहांवर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत असून, त्यानंतर मृतदेह कामठी येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहेत. तसेच इतर सर्व जखमींनाही रुग्णवाहिकेद्वारे कामठी येथे आणण्यात येणार असल्याची माहिती गुलाब पारसे यांनी दिली.