हॉटेलच्या टेरेसवर पेटल्या चुली,‘जुन्याच’ पद्धतीचा आधार
रत्नागिरी (प्रतिनिधी) : जागतिक युद्धजन्य परिस्थितीची झळ आता हाॅटेल व्यवसायाला बसू लागली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरवर मर्यादा आणल्याने हाॅटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. मात्र, या संकटावर मात करण्यासाठी रत्नागिरीतील एका हाॅटेल व्यावसायिकाने चक्क हाॅटेलच्या टेरेसवर ‘चुली’ मांडून व्यवसाय सुरू ठेवण्याचा पर्याय शाेधला आहे.

युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. याचाच परिणाम म्हणून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा संपत चालला आहे. अशा परिस्थितीत हॉटेल बंद ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय निवडणे गरजेचे हाेते. त्यामुळे रत्नागिरीतील हाॅटेल व्यावसायिक सुहास ठाकूरदेसाई यांनी हाॅटेलच्या टेरेसवर चुली पेटवून हा व्यवसाय सुरू ठेवण्याचा पर्याय निवडला आहे.
कोकणात येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये आणि व्यवसाय सुरू राहावा, या उद्देशाने चुली पेटविण्याचा पर्याय निवडण्यात आला आहे. आता या चुलींवरच अन्नपदार्थ शिजविले जाणार आहेत. गॅसची कमतरता असल्याने आणि चुलीवर स्वयंपाक करण्यास लागणारा वेळ लक्षात घेता, हॉटेलमध्ये सध्या जेवणाचे मोजकेच ४ प्रमुख मेन्यू ठेवण्यात आले आहेत, असे ठाकूरदेसाई यांनी सांगितले.
आधुनिक युगात गॅस आणि ओव्हनवर चालणारी हॉटेल्स आता पुन्हा एकदा पारंपरिकतेकडे वळत आहेत. एकीकडे लाकडाची ताेड राेखण्यासाठी शासनाकडून ‘उज्वला गॅस’ याेजना सुरू करण्यात आली. मात्र, गॅस सिलिंडरच्या मर्यादेमुळे आता पुन्हा ‘जुन्याच’ पद्धतीचा आधार घेण्याची वेळ आली आहे.




