महाराष्ट्र बंदवर राजकीय घडामोडी; शरद पवार गटाचा पाठिंबा, वंचित कार्यकर्त्यांना पोलिसांचा इशारा
मुंबई (प्रतिनिधी) : देशभरात शिक्षण व्यवस्थेतील मुद्दे, विद्यार्थ्यांची आंदोलने आणि दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधाची चर्चा सुरू असताना, वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राज्यभर जिथे-जिथे विद्यार्थी आंदोलने होतील, तिथे पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती दिली आहे.
मात्र, दुसऱ्या बाजूला राज्यातील विविध भागांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे. बंददरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा किंवा जबरदस्तीने दुकाने, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, वाहतूक सेवा किंवा इतर आस्थापना बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा नोटिसांमध्ये देण्यात आला आहे.
मुंबईत लागू असलेल्या जमावबंदी आदेशाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात जमाव जमवू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कुर्ला, सायन, विक्रोळी पार्कसाईटसह काही भागांतील कार्यकर्त्यांना नोटिसा मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच, छत्रपती संभाजीनगरमध्येही पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा देण्यास सुरुवात केली असून, शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.आता या महाराष्ट्र बंदला जनतेचा आणि विविध राजकीय पक्षांचा किती प्रतिसाद मिळतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.




