सोनम वांगचुक यांना खाजगी रुग्णालयात हलवण्याची मागणी दिल्ली हायकोर्टाने फेटाळली; वाचा नेमकं काय घडलं?
नवी दिल्ली: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सरकारी रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात दाखल करण्याची त्यांच्या पत्नीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने तूर्तास फेटाळली आहे. वांगचुक यांची बिघडलेली प्रकृती पाहता, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सरकारचा निर्णय योग्य होता आणि तो मनमानी नव्हता, असे न्यायालयाने म्हटले आहे.

या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा यांनी स्पष्ट केले की, प्रकृती खालावलेली असतानाही वांगचुक स्वतःहून रुग्णालयात दाखल होण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करण्याचा पूर्ण अधिकार होता.
न्यायालयाने नोंदवले महत्त्वाचे मुद्दे:
-
कुटुंबीयांना भेटीची मुभा: वांगचुक यांच्या कुटुंबीयांना दिवसभर कोणत्याही निर्बंधांशिवाय त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे, तसेच त्यांच्यासाठी स्वतंत्र खोलीही उपलब्ध करून दिली आहे, या सरकारी दाव्याची न्यायालयाने नोंद घेतली.
-
वैद्यकीय अहवाल देण्याचे निर्देश: या टप्प्यावर कोणताही अंतरिम आदेश देण्याची गरज नसल्याचे सांगत न्यायालयाने वांगचुक यांचा वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबीयांना सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २४ जुलै रोजी होणार आहे.
सोनम वांगचुक यांच्या बाजूने काय युक्तिवाद झाला?
वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिबल, विवेक तंखा आणि अखिल सिबल यांनी न्यायालयात बाजू मांडली:
-
संपर्कावर निर्बंध: सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यापासून वांगचुक यांना त्यांच्या वकिलांशी आणि डॉक्टरांशी संपर्क साधू दिला जात नाहीये.
-
हक्कांचे उल्लंघन: वांगचुक यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा त्यांना ताब्यात घेतलेले नाही. मग एका भारतीय नागरिकाला स्वतःच्या पसंतीच्या (मेदांता) रुग्णालयात उपचार घेण्याचा अधिकार नाही का? सरकार त्यांच्यावर जबरदस्ती का करत आहे, असा सवाल वकिलांनी उपस्थित केला.
केंद्र सरकारचा युक्तिवाद काय होता?
केंद्राच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी बाजू मांडली.
-
तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात: सफदरजंग रुग्णालय आणि एम्स (AIIMS) मधील डॉक्टरांचे एक विशेष पथक वांगचुक यांच्यावर उपचार करत आहे. त्यांना सध्या आपत्कालीन विभागात ठेवण्यात आले आहे.
-
योग्य काळजी सुरू: वांगचुक यांच्या संमतीनेच त्यांना शुगर-फ्री इलेक्ट्रोलाइट्स देण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या रक्ताच्या चाचण्या एम्स, सफदरजंग आणि एका खाजगी लॅबमध्येही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरकारी उपचारांवर संशय घेण्याचे कोणतेही कारण नाही, फक्त वांगचुक यांनी डॉक्टरांना सहकार्य करावे, असे सरकारने कोर्टात स्पष्ट केले.




