सोनम वांगचुक यांचे १५ दिवसांत ७.५ किलो वजन घटले! अंजली दमानिया अस्वस्थ, म्हणाल्या 'हा लोकशाहीचा अपमान...'
मुंबई/नवी दिल्ली : 'नीट' (NEET) परीक्षा घोटाळा आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतरमंतर येथे 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) आंदोलन गेल्या २२ दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत २८ जूनपासून बेमुदत उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज १५ वा दिवस आहे. मात्र, एवढे दिवस उलटूनही सरकारकडून अद्याप कोणीही त्यांची साधी दखलही घेतलेली नाही. यावरून महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 'X' (ट्विटर) वर पोस्ट करत सरकारविरोधात आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या निर्दयी लोकांना भुकेची तगमग कळेल
अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये सरकारच्या उदासीनतेवर कडक शब्दांत टीका केली आहे. त्या म्हणाल्या, "खूप अस्वस्थ वाटतंय, कारण सोनम वांगचुक १४-१५ दिवस झाले उपोषणावर आहेत. पण आपल्या निर्दयी सरकारला ना त्यांच्याशी बोलण्याची तसदी घ्यायची आहे, ना त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यायची आहे. त्यामुळे इतका राग येतोय की असं वाटतंय, या सत्ताधाऱ्यांना खेचून आणून १४ दिवस उपोषणावर बसवावं. तेव्हा कुठे उपोषण म्हणजे काय असतं? भूक काय असते? शरीराची आणि मनाची तगमग काय असते? याची जाणीव या संवेदनाशून्य लोकांना होईल."
तुम्ही जगा किंवा मरा, आम्हाला फरक पडत नाही
लोकशाहीच्या सद्यस्थितीवर बोट ठेवत दमानिया पुढे म्हणाल्या, "लोकशाहीत सरकार जनतेचे ऐकते, पण इथे सरकारचा संदेश स्पष्ट आहे- 'तुम्ही न्याय मागा, उपोषण करा, जगा किंवा मरा, आम्हाला काहीच फरक पडत नाही. कारण सत्ता आमच्याकडे आहे आणि तुम्ही आमचे काहीच बिघडवू शकत नाही.' ही केवळ एका आंदोलनाची उपेक्षा नसून, हा थेट लोकशाहीच्या आत्म्याचा अपमान आहे."

वांगचुक यांचे वजन ७.५ किलोने घटले; प्रकृती चिंताजनक
दुसरीकडे, सलग १५ दिवसांच्या उपोषणामुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती झपाट्याने खालावत चालली आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'ने दिलेल्या माहितीनुसार, अन्नत्यागामुळे वांगचुक यांचे वजन तब्बल ७.५ किलोग्रॅमने कमी झाले आहे. शनिवारी त्यांचा रक्तदाब (ब्लड प्रेशर) १०६/७४ मिमी एचजी इतका खालावलेला नोंदवला गेला.
२० जुलैला 'संसदेवर शांततापूर्ण मोर्चा'; वांगचुक यांचे आवाहन
प्रकृती खालावलेली असतानाही सोनम वांगचुक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच २० जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. "आमच्यासारखे तुम्हाला २४ दिवस अन्नाशिवाय राहण्याची गरज नाही. तुम्ही जेवण करून या, पण देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून २० जुलै रोजी आमच्यासोबत मोर्चात सामील व्हा," अशी भावनिक हाक वांगचुक यांनी देशवासीयांना दिली आहे.




