कोल्हापुरात रस्त्यांवरील खड्ड्यांनी घेतला बळी? प्रशासनाचा अजब खुलासा; संतप्त नातेवाईकांनी थेट खड्ड्यातच ठेवला मृतदेह
कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूर-गारगोटी राज्य मार्गावर कळंबा साई मंदिरानजीक दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघातातील जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राजेंद्र गायकवाड असे या दुर्दैवी नागरिकाचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी काल (११ जुलै) सायंकाळी चक्क अपघात झालेल्या रस्त्यावरील खड्ड्यामध्ये मृतदेह ठेवून महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध केला. या घटनेचा आणि नागरिकांच्या आक्रोशाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नेमकी घटना काय?
कळंबा परिसरात राहणारे राजेंद्र गायकवाड हे दोन दिवसांपूर्वी रस्त्यावरून जात असताना, समोरून येणाऱ्या एका भरधाव दुचाकीस्वाराने रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत गायकवाड गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. काल शनिवारी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली, तेव्हा संतप्त ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी थेट खड्ड्यात मृतदेह ठेवून प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली.
महापालिकेचा अजब खुलासा
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि नागरिकांचा रोष वाढल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेने यावर एक स्पष्टीकरण दिले आहे. महापालिकेच्या दाव्यानुसार, "राजेंद्र गायकवाड यांचा अपघात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेला नाही. अपघात करणाऱ्या तरुणांकडे स्पोर्ट्स बाईक होती आणि ते मद्यधुंद अवस्थेत होता. भरधाव वेगामुळे त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला."
खड्डे की मद्यधुंद चालक? पोलीस तपासाकडे लक्ष
गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने रस्त्यांची चाळण झाली असून जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. एका बाजूला, "खड्डा चुकवतानाच दुचाकीस्वाराने नियंत्रण गमावले आणि गायकवाड यांचा हकनाक बळी गेला," असा आरोप नातेवाईक करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला, महापालिका अपघाताचे खापर वाहनचालकाच्या मद्यधुंद अवस्थेवर आणि वेगावर फोडत आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे संभ्रम निर्माण झाला असून, करवीर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




