जि. प. कर्मचारी सोसायटीतर्फे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व ग्रंथालयाचे उद्या उद्घाटन

जि. प. कर्मचारी सोसायटीतर्फे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व ग्रंथालयाचे उद्या उद्घाटन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लि., कोल्हापूर या संस्थेच्या हिरक महोत्सव वर्षात पदार्पणा निमित्त सभासदांच्या मुला-मुलींसाठी स्पर्धा परीक्षेसाठी सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालयाचा उद्घाटन समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मंगळवार ८ सप्टेंबर रोजी दुपारी संस्थेच्या मुख्य कार्यालयात पार पडणार आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन संजय श्रीपतराव शिंदे यांनी दिली.

संस्थेच्या सभासदांच्या मुलांना स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी संस्थेमार्फत पुस्तके दिली जातात. या उपक्रमातून आजवर सभासदांची ५० पेक्षा जास्त मुले ही शासकीय सेवेतील वर्ग १ व वर्ग २ च्या पदावर निवड होऊन कार्यरत आहेत. अशाच पद्धतीने सभासदांच्या मुलांना फक्त पुस्तके न देता त्यांना अभ्यासाकरिता जागा देण्याची संकल्पना वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रत्यक्षात आणली आहे. सदरची अभ्यासिका ही सुसज्ज पुस्तकांसह मुलांच्या अभ्यासासाठी उपलब्ध आहे.

सदर अभ्यासाचा व ग्रंथालयाचा लाभ सभासदांच्या मुलांनी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन चेअरमन संजय शिंदे, व्हॉ. चेअरमन जयकुमार रेळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी बोरगे यांच्यासह संचालक मंडळ, तज्ञ संचालक व संस्थेच्या मार्गदर्शकांच्या वतीने करण्यात आले आहे.