‘पुतण्याच्या लग्नात नाचलो, DJचा आवाज आला अन् एका कानाने 40% ऐकू येणं बंद झालं’; मंत्री गुलाबराव पाटलांची आपबिती, गणेशोत्सवात DJ न लावण्याचं आवाहन

‘पुतण्याच्या लग्नात नाचलो, DJचा आवाज आला अन् एका कानाने 40% ऐकू येणं बंद झालं’; मंत्री गुलाबराव पाटलांची आपबिती, गणेशोत्सवात DJ न लावण्याचं आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : ‘माझ्या पुतण्याच्या लग्नात डीजे होता. घरचं लग्न असल्यामुळे लोकांनी मला नाच म्हणाले. पण डीजेच्या आवाजाने कानात असा काही आवाज आला की, एका कानाला 40 टक्के रिपेअरच करू शकत नाही. डीजेमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे येत्या गणेशोत्सवात तरुणांनी डीजे लावला नाही तर चांगले होईल,’ अशी आपबिती सांगत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी डीजे, डॉल्बी आणि साऊंड सिस्टीमबाबत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

 अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. दरम्यान, या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईट्सच्या वापरावरून वातावरण चांगलंच तापलं आहे.

 ध्वनीप्रदूषण, नागरिकांचे आरोग्य आणि सणांची सांस्कृतिक परंपरा या मुद्द्यांवरून नागरिक, गणेश मंडळे आणि राजकीय नेत्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. अशातच याच मुद्द्यावरून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईट्सच्या धोक्यांबाबत भाष्य केले आहे. तसेच गणेशोत्सवात डीजे न लावता पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 ‘माझ्या पुतण्याच्या लग्नात डीजे होता. घरचं लग्न असल्यामुळे लोकांनी मला नाच म्हणाले. पण डीजेच्या आवाजाने कानात असा काही आवाज आला की, एका कानाला 40 टक्के रिपेअरच करू शकत नाही. डीजेमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे येत्या गणेशोत्सवात तरुणांनी डीजे लावला नाही तर चांगले होईल,’ असे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

 जळगाव तालुक्यातील पिलखेडा येथे पोळ्यानिमित्त साज वाटपाच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. दरम्यान, डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईटला महाराष्ट्रातून हद्दपार करा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांनी थेट पत्राद्वारे केली आहे. उत्सव असो किंवा खासगी कार्यक्रम, डीजे आणि लेझर लाईटवर कायमस्वरूपी बंदीचा धाडसी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

 विशेष म्हणजे, सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी डीजेच्या आवाजाबाबत मांडलेल्या भूमिकेचे ज्येष्ठ नागरिकांनी समर्थन केले आहे. ‘डीजे समोर आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना बसवा आणि त्यानंतरच डीजेला परवानगी द्या,’ ही एसपींची भूमिका चुकीची नसल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.

 मात्र, एसपींनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावे, असे आवाहनही ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात आले आहे.