मराठा आरक्षणाचा भडका! जरांगे पाटलांच्या उपोषणाचे उमटले पडसाद; सोलापुरात मंत्र्यांच्या गाडीखाली घुसण्याचा प्रयत्न
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले असून, या आंदोलनाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटू लागले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत धडकण्याचा इशारा त्यांनी दिला असून, या आंदोलनामुळे राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

राज्यभरात रास्ता रोको आणि आंदोलनाचा पवित्रा
छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड येथे मराठा आंदोलकांनी रास्तारोको करत जळगाव महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. आंदोलकांनी रस्त्यावरच बॅनर लावून सरकारविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली. जरांगे-पाटील यांच्या या नव्या आंदोलनामुळे मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला असून, ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत आंदोलनाचे लोन पसरत चालले आहे.
सोलापुरात मंत्र्यांच्या गाडीसमोर राडा
सोलापूरच्या माढा तालुक्यात आंदोलनादरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. मराठा आंदोलक बापू गायकवाड यांनी सहकार राज्यमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वाहनाचा पाठलाग केला. धावत्या गाडीमागे पळत जात त्यांनी थेट गाडीखाली घुसण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. दरम्यान, पोलिसांनी तत्परता दाखवत आंदोलकाला गाडीखालून बाहेर काढले. या संपूर्ण घटनेदरम्यान मंत्री बाबासाहेब पाटील आपल्या वाहनातच बसून राहिले आणि नंतर त्यांचा ताफा तुळजापूरकडे रवाना झाला.
मुंबईत धडकण्याचा इशारा कायम
मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका कायम ठेवली असून, सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यास ४५ लाख मराठा बांधवांसह मुंबईत धडक मारण्याचा इशारा दिला आहे. आगामी काळात या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




