नवा गडी, नवं राज्य! ‘बिअर प्यायची असेल तर प्या, पण; कॅप्टन होताच जो रूटने इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू हटवला
मुंबई (प्रतिनिधी) : इंग्लंडच्या कसोटी संघाची पुन्हा धुरा हाती घेतल्यानंतर जो रूटने खेळाडूंसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रूटने संघावर लागू असलेली रात्रीची संचारबंदी अर्थात नाइट कर्फ्यू हटवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता खेळाडूंना हॉटेलबाहेर राहण्यासाठी किंवा सामना जिंकल्यानंतर जल्लोष करण्यासाठी पूर्वीसारखी वेळेची मर्यादा असणार नाही. मात्र, या स्वातंत्र्यासोबत जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असल्याचा स्पष्ट संदेश रूटने दिला आहे.

बेन स्टोक्सच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर 35 वर्षीय जो रूटची इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्यासमोर आता 19 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचं आव्हान असणार आहे. ॲशेस मालिकेदरम्यान खेळाडूंच्या वर्तनावरून झालेल्या वादानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने रात्रीची संचारबंदी लागू केली होती.
त्या दौऱ्यात इंग्लिश खेळाडू रात्री उशिरापर्यंत मद्यपान करत असल्याच्या आणि अनेकदा कॅसिनोंमध्ये गेल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर बोर्डाने शिस्त अधिक कडक करत खेळाडूंच्या रात्री बाहेर राहण्यावर निर्बंध घातले. मात्र, त्यानंतरही हा वाद थांबला नाही. न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत विजयानंतर बेन स्टोक्स आणि गस ॲटकिन्सन यांनी कर्फ्यूचे उल्लंघन केल्याचे वृत्त समोर आले होते.
आता जो रूटला खेळाडूंसोबत वेगळ्या पद्धतीने पुढे जायचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी स्वतःची जबाबदारी समजून घेतली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीवर निर्बंध लादण्याची गरज नाही, असं त्याचं मत आहे.
स्काय स्पोर्ट्स क्रिकेट पॉडकास्टवर बोलताना रूट म्हणाला, “आता कर्फ्यू असणार नाही. मला वाटत नाही की याचा एवढा मोठा मुद्दा बनवण्याची गरज आहे. प्रौढांसारखे वागा, स्वतःची आणि एकमेकांची काळजी घ्या.”जो रूटचा भर संघामध्ये अशा संस्कृतीवर आहे, जिथे खेळाडूंना जल्लोष करण्याची योग्य वेळ आणि क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ यातील फरक समजेल. कसोटी सामना जिंकल्यानंतर खेळाडूंनी जल्लोष करण्यावरही त्याला कोणतेही अनावश्यक निर्बंध नको आहेत.
रूट म्हणाला, “केवळ बिअर प्यायची आहे म्हणून कसोटी सामना जिंकल्यानंतर खेळाडूंना जल्लोष करता येणार नाही, असं मला वाटू नये. योग्य वेळी थोडा आराम करणं पूर्णपणे ठीक आहे. शेवटी, आम्हीसुद्धा माणसेच आहोत.”मात्र, खेळाडूंनी आपण इंग्लंडचे प्रतिनिधित्व करत आहोत हे कायम लक्षात ठेवायला हवं, असंही रूटने स्पष्ट केलं. स्वातंत्र्य मिळालं असलं तरी मैदानाबाहेरील वर्तनाची जबाबदारी खेळाडूंचीच असेल.
दरम्यान, ईसीबीनेही रात्रीची संचारबंदी यापुढे लागू राहणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. नवीन कसोटी कर्णधार आणि प्रशिक्षक संघाचे मापदंड आणि संस्कृती नव्याने ठरवण्यावर काम करत असल्याचं बोर्डाने सांगितलं आहे. आगामी कसोटी मालिकेपूर्वी सर्व खेळाडूंना त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा स्पष्टपणे सांगितल्या जातील. म्हणजेच, आता कर्फ्यूऐवजी खेळाडूंच्या वर्तनासाठी स्पष्ट नियम आणि जबाबदारीचे मापदंड असणार आहेत.




