कोल्हापुरात 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत भाजपाची भव्य पदयात्रा; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले

कोल्हापुरात 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत भाजपाची भव्य पदयात्रा; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले

कोल्हापूर: भारतीय जनता पार्टी, कोल्हापूरच्या वतीने ‘हर घर तिरंगा – तिरंगा यात्रा’ अभियानांतर्गत शहरात भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मिरजकर तिकटी येथून सुरू झालेल्या या पदयात्रेने संपूर्ण कोल्हापूर शहरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण केले.

 

पदयात्रेच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन, 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्'च्या जयघोषात पदयात्रेला सुरुवात झाली.

ही तिरंगा पदयात्रा मिरजकर तिकटी येथून निघून बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक मार्गे ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी देशभक्तीपर घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतमाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेतील कलाकार विशेष आकर्षण ठरले.

"तिरंगा हा अखंड राष्ट्रभावनेचा अभिमान" - आमदार अमल महाडिक

या प्रसंगी बोलताना आमदार अमल महाडिक म्हणाले, "तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नसून तो देशाच्या स्वातंत्र्याचा, शौर्याचा आणि अखंड राष्ट्रभावनेचा अभिमान आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ होत आहे. कोल्हापूरकरांनी या रॅलीला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हाच देशभक्तीचा प्रबळ पुरावा आहे."

या पदयात्रेत शहरांमधील विविध तालीम संस्था, सामाजिक संघटना, भाजपचे पदाधिकारी, महिला व युवा कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महापौर रूपाराणी निकम, माजी प्रदेश सचिव महेश जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, गटनेते मुरलीधर जाधव, स्थायी समिती सभापती किरण शिराळे, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, सरचिटणीस विराज चिखलीकर, अमर साठे, महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी नकाते, विश्वजीत पवार, अनिल कामत आणि महेश यादव यांच्यासह पक्षाचे अनेक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.