‘संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? पुरावा किंवा फोटो आहे का?’ राऊतांच्या आरोपांवर रामदास कदमांचा पलटवार

‘संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? पुरावा किंवा फोटो आहे का?’ राऊतांच्या आरोपांवर रामदास कदमांचा पलटवार

मुंबई (प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दबावाखाली शिवसेना पक्ष 5 हजार कोटी रुपयांना एकनाथ शिंदे गटाला विकल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही राऊतांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांच्या विधानांवर आता कोणीही विश्वास ठेवत नाही आणि त्यांना कोणी गंभीरपणे घेत नाही, अशी टीका रामदास कदम यांनी केली. “सकाळी उठून एखादा फेक बॉम्ब टाकायचा, काहीतरी विधानं करून प्रसिद्धी मिळवायची, यापलीकडे त्यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नसतं,” असं कदम म्हणाले.

शिंदे गटाला शिवसेना पक्ष 5 हजार कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करताना संजय राऊत स्वतः नोटा मोजायला गेले होते का? त्यांच्याकडे याचा काही पुरावा किंवा फोटो आहे का? असा सवाल रामदास कदम यांनी केला. केवळ हवेत तलवारी चालवून प्रसिद्धी मिळवण्याचं काम सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

अमित शाह उपपंतप्रधान झाले तर तुमचं काय बिघडतं? सत्ता आणि सरकार त्यांचंच आहे, असंही रामदास कदम म्हणाले. दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा स्वतःची फाटलेली आघाडी कशी जोडता येईल, याकडे आधी लक्ष द्यावं, असा टोलाही त्यांनी लगावला.

गिरीश महाजन यांच्या नातेवाईकावर झालेल्या कारवाईबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले की, एखादा मंत्री संबंधित व्यक्तीचा नातेवाईक असतानाही त्याच्यावर कारवाई आणि चौकशी होत असेल, तर महाराष्ट्र सरकार किती पारदर्शकपणे काम करत आहे, हे यावरून स्पष्ट होतं. मुंबई महानगरपालिकेत गेल्या 25 वर्षांत कोणत्या पद्धतीने कामं देण्यात आली आणि कारभार चालला, याचा सर्वांनी अभ्यास करावा, असा टोलाही कदमांनी ठाकरे गटाला लगावला.

बेळगाव सीमा प्रश्न आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरही रामदास कदम यांनी भाष्य केलं. भाषावार प्रांतरचना झाल्यापासून सीमाभागातील मराठी माणसावर सातत्याने अन्याय झाला आहे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, त्यावर लवकरच निकाल येण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधानांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घातल्यास सीमाभागातील मराठी माणसाला निश्चितच न्याय मिळेल, असं रामदास कदम म्हणाले.

राज्यातील बंद पडलेल्या कारखान्यांच्या मुद्द्यावरही त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात किती कारखाने बंद पडले, याचा आधी हिशोब द्यावा, अशी टीका त्यांनी केली. आर्थिक मंदी किंवा कारखाने बंद पडण्याची समस्या केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. तरीही महाराष्ट्र आज उद्योग क्षेत्रात देशात आघाडीवर आहे, असा दावा रामदास कदम यांनी केला.