"पत्नीच्या हत्येनंतर प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो? अमेरिकेत भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअर अटकेत
मुंबई (प्रतिनिधी) : अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला पत्नीच्या कथित हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या आरोपानुसार, पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने तिच्या मृतदेहाचा फोटो भारतातील आपल्या प्रेयसीला पाठवला. सुमारे नऊ महिन्यांच्या तपासानंतर आरोपीला प्रथम श्रेणी हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून, दोषी ठरल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

आरोपीची ओळख तेलंगणातील 30 वर्षीय अविनाश नार्ने अशी झाली आहे. तो अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. 5 जून 2025 रोजी त्याचे 27 वर्षीय रजिथा सब्बिननी हिच्याशी लग्न झाले होते.
27 ऑक्टोबर 2025 रोजी अविनाशने पोलिसांना फोन करून पत्नी बाथरूममध्ये बंद असल्याचे सांगितले. पोलिसांनी दरवाजा तोडल्यानंतर रजिथाचा मृतदेह आत आढळला. सुरुवातीला त्याने आपण काही वेळ घराबाहेर गेलो होतो, असा दावा केला. मात्र, अपार्टमेंटच्या स्मार्ट लॉक आणि सुरक्षा यंत्रणेतील नोंदी तपासल्यानंतर त्या काळात घरात इतर कोणीही प्रवेश केला नसल्याचे स्पष्ट झाले.शवविच्छेदन अहवालात रजिथाचा मृत्यू गळा दाबल्यामुळे गुदमरून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास हत्या म्हणून सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांना अविनाशचे भारतातील एका महिलेशी अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, ती महिला त्याच्या लग्नालाही उपस्थित होती, असा पोलिसांचा दावा आहे. लग्नानंतरही दोघे सातत्याने संपर्कात होते. हत्येच्या दिवशीही त्यांच्यात अनेक वेळा संवाद झाल्याचा तपासात उल्लेख आहे. तसेच, पत्नीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या मृतदेहाचा फोटो प्रेयसीला पाठवल्याची कबुली आरोपीने चौकशीदरम्यान दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.
तपासात पती-पत्नीमधील चॅट्सही समोर आले. त्यामध्ये रजिथाने पतीने बनवलेल्या पेयांची चव वारंवार कडू लागत असल्याची तक्रार केली होती. मृत्यूच्या दिवशी तिने स्मूदीची चव औषध आणि खोकल्याच्या सिरपसारखी असल्याचा संदेशही पाठवला होता. दुसरीकडे, पोलिसांना दिलेल्या माहितीत अविनाशने पत्नीची तब्येत बिघडली होती आणि खोकल्याचे सिरप घेतल्यानंतर ती बाथरूममध्ये कोसळली असावी, असे सांगितले होते.
डिजिटल रेकॉर्ड, कॉल डिटेल्स आणि इतर पुरावे तपासल्यानंतर जुलै 2026 मध्ये पोलिसांनी अविनाशला पुन्हा चौकशीसाठी बोलावले आणि प्रथम श्रेणी हत्येच्या आरोपाखाली अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून, जामिनासाठी 50 लाख डॉलर्सची रक्कम निश्चित करण्यात आल्याचे वृत्त आहे.




