युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा

युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धबंदीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांनी आपल्या सैन्याला गोळीबार थांबवण्याचे आदेश दिले असले, तरी त्यांनी अमेरिकेला कडक शब्दांत सुनावले आहे. "ही युद्धबंदी म्हणजे युद्धाचा शेवट नाही," असे म्हणत खामेनेई यांनी भविष्यातील संघर्षाचे संकेत दिले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे इराणवरील हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करत असल्याचे जाहीर केले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. मात्र, ही युद्धबंदी 'होर्मुजची सामुद्रधुनी' पूर्णपणे खुली ठेवण्याच्या अटीवर करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेनंतर इराणमध्ये विजयाचा जल्लोष साजरा होत असला, तरी लष्करी पातळीवर अद्याप तणाव कायम आहे.

इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने स्पष्ट केले की, जरी आम्ही सध्या गोळीबार थांबवला असला, तरी आमचे लक्ष शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर आहे. इराणच्या सरकारी वाहिनीवर मोज्तबा खामेनेई यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला. यात त्यांनी म्हटले आहे की, "सर्व लष्करी शाखांनी आदेशाचे पालन करून गोळीबार थांबवावा, पण सावध राहावे. शत्रूने थोडी जरी चूक केली, तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल."ट्रम्प यांनी सांगितले की, इराणकडून त्यांना १० कलमी प्रस्ताव प्राप्त झाला आहे, जो चर्चेसाठी योग्य आहे. 

इराणने प्रामुख्याने खालील मागण्या ठेवल्या आहेत :

१. कोणतेही आक्रमण नाही

२. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण कायम

३. संवर्धनाची स्वीकृती

४. सर्व प्राथमिक निर्बंध हटवणे 

५. सर्व दुय्यम निर्बंध हटवणे 

६. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सर्व ठराव रद्द करणे

७. आयएईएच्या नियामक मंडळाचे सर्व ठराव रद्द करणे 

८. इराणला नुकसान भरपाई देणे

९. या प्रदेशातून अमेरिकेच्या लढाऊ सैन्याची माघार

१०. लेबनॉनमधील शौर्यपूर्ण इस्लामी प्रतिकारासह सर्व आघाड्यांवरील शत्रुत्व थांबवणे