बीड-पुणे रेल्वे 17 सप्टेंबरपासून धावणार; बीड-मुंबई रेल्वे डिसेंबरमध्ये सुरू होणार, सुनेत्रा पवारांच्या युद्धपातळीवर कामाच्या सूचना

बीड-पुणे रेल्वे 17 सप्टेंबरपासून धावणार; बीड-मुंबई रेल्वे डिसेंबरमध्ये सुरू होणार, सुनेत्रा पवारांच्या युद्धपातळीवर कामाच्या सूचना

मुंबई (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाची ठरणारी ‘बीड–पुणे’ रेल्वे येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार आहे. या रेल्वेसाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच डिसेंबरअखेर ‘बीड–मुंबई’ म्हणजेच पनवेल रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या आहेत.

सह्याद्री अतिथीगृह येथे ‘अहिल्यानगर–बीड–परळी’ रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी तसेच ‘बीड–पुणे’ आणि ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, बीडसह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या ‘बीड–पुणे’ आणि ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवेसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे ‘अहिल्यानगर–बीड–परळी’ या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती मिळाली.

गतवर्षी बीडकरांची 40 वर्षांची प्रतीक्षा संपली आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी म्हणजेच 17 सप्टेंबर 2025 रोजी ‘बीड ते अहिल्यानगर’ रेल्वे सेवा प्रत्यक्ष सुरू झाली. आता याच ऐतिहासिक दिवशी यावर्षी ‘बीड–पुणे’ रेल्वे सेवा सुरू होणार आहे. ‘बीड–पुणे’ रेल्वे सुरू झाल्यानंतर जिल्ह्याची पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी थेट आणि अधिक सक्षम रेल्वे जोडणी निर्माण होणार आहे. यामुळे बीडच्या कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक आणि व्यापार क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. तसंच नागरिकांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी होण्यासही मदत होणार आहे.

बीडच्या आर्थिक विकासासाठी हा रेल्वे मार्ग महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. 17 सप्टेंबर रोजी ‘बीड–पुणे’ रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी उर्वरित सर्व तांत्रिक, प्रशासकीय आणि सुरक्षाविषयक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्याचबरोबर डिसेंबरअखेर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवून आवश्यक कामांचा कालबद्ध आराखडा तयार करावा आणि सर्व कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

येत्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ‘बीड–पुणे’ रेल्वे सेवेच्या ऐतिहासिक शुभारंभ कार्यक्रमाची तयारी नियोजनबद्ध, प्रभावी आणि समन्वयाने करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.‘बीड–पुणे’ आणि पुढे ‘बीड–मुंबई’ ही केवळ रेल्वे सेवा नसून बीडच्या विकासाला जोडणारी नवी जीवनवाहिनी आहे. दिवंगत अजितदादांनी पाहिलेल्या विकसित बीडच्या स्वप्नपूर्तीसाठी या रेल्वे जोडणीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमूद केलं आहे.