2 लाखांच्या कर्जमाफीवर शेतकऱ्यांचा सवाल; पासबुक दाखवत मांडली व्यथा, कृषिमंत्री भरणेंचं स्पष्टीकरण

2 लाखांच्या कर्जमाफीवर शेतकऱ्यांचा सवाल; पासबुक दाखवत मांडली व्यथा, कृषिमंत्री भरणेंचं स्पष्टीकरण

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारने जाहीर केलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. जाहीर केलेल्या रकमेऐवजी कमी कर्जमाफी मिळाल्याचा दावा करत शेतकऱ्यांनी पासबुक दाखवत नाराजी व्यक्त केली.

तुळजापूर तालुक्यातील गंधोरा गावातील 233 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे सांगितले जात असले, तरी त्यापैकी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमेत तफावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बँकांच्या फेऱ्या मारत असून, कर्जमाफीच्या यादीत दुरुस्ती करण्याची मागणी करत आहेत.

गावातील शेतकरी जीवन विष्णू पाटील यांनी सांगितले की, त्यांच्या नावावर बँकेचे 1 लाख 54 हजार 738 रुपयांचे कर्ज आहे. मात्र, कर्जमाफीच्या यादीत त्यांना केवळ 94 हजार 427 रुपयांचाच लाभ मिळाल्याचे दिसत आहे. उर्वरित रक्कम भरल्यानंतरच कर्जमाफी लागू होईल, असे बँकेकडून सांगण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

या प्रकरणावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, दोन लाख रुपयांपर्यंतचे पात्र कर्ज असल्यास शेतकऱ्यांना कोणतीही अतिरिक्त रक्कम भरण्याची गरज नाही. एखाद्या प्रकरणात लाभ नाकारला गेला असेल, तर त्यामागे कागदपत्रांची अपूर्णता किंवा तांत्रिक कारण असू शकते. अशा प्रकरणांची पडताळणी करून पुढील याद्यांमध्ये पात्र लाभार्थ्यांचा समावेश केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, पीक विमा योजनांबाबतही काही तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगत, या संदर्भात केंद्रीय कृषिमंत्र्यांना पत्र पाठवले असून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही दत्तात्रय भरणे यांनी दिली.