MPSC सचिवांना संभाजी ब्रिगेडकडून काळं फासलं; गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा कारवाईचा इशारा

MPSC सचिवांना संभाजी ब्रिगेडकडून काळं फासलं; गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा कारवाईचा इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, MPSC विद्यार्थ्यांनी पुण्यात मोर्चाही काढला होता. या आंदोलनात विरोधी पक्षातील नेतेही सहभागी झाले होते. शासनाने MPSC अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली होती. त्यानंतर सरकारनेही भूमिका स्पष्ट करत, पेपरफुटीच्या प्रकरणात जे जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. एकीकडे या प्रकरणात कारवाई सुरू असतानाच, आज संभाजी ब्रिगेडने MPSCच्या सचिवांना काळं फासल्याची घटना घडली. या घटनेनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आंदोलकांना कारवाईचा इशारा दिला आहे.

नवी मुंबईतील MPSC कार्यालयात सचिवांना संभाजी ब्रिगेडकडून काळं फासण्यात आलं. या घटनेवर प्रतिक्रिया देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संभाजी ब्रिगेडवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

सचिवांच्या कार्यालयात जाऊन त्यांना काळं फासल्याच्या घटनेवर योगेश कदम यांनी भाष्य केलं. अशा प्रकारचे आंदोलन करून प्रसिद्धी मिळवता, मात्र त्यातून प्रश्न सुटणार नाही. MPSC प्रकरणात जे जे दोषी असतील, त्यांच्यावर सरकार कारवाई करणार आहे. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. तसेच, अशा आंदोलनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाईल, असं योगेश कदम यांनी म्हटलं. दरम्यान, धाराशिवमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले. धाराशिवहून परंडाकडे जात असताना योगेश कदम यांचा ताफा आंदोलकांनी अडवला.

मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. तसेच, योगेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एकेरी भाषा वापरल्यास ते सहन करणार नाही, असं वक्तव्य केल्याने मराठा आंदोलकांमध्ये संताप निर्माण झाला. याच मुद्द्यावरून मराठा आंदोलकांनी योगेश कदम यांचा ताफा अडवत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत आणि योगेश कदम यांच्या वक्तव्याबाबत जाब विचारला. अचानक ताफा अडवण्यात आल्याने घटनास्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

 दरम्यान, संभाजी ब्रिगेडने MPSC सचिवांच्या तोंडाला काळं फासल्यानंतर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. MPSCचा अभ्यास करणाऱ्या 25 लाख विद्यार्थ्यांच्या आणि महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने भ्रष्ट व्यवस्थेच्या आणि सरकारच्या तोंडाला काळं फासल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आली.

 महेंद्र हरपाळकर यांच्या थोबाडीत मारलेली चपराक ही सरकारला जनतेच्या वतीने संभाजी ब्रिगेडने मारलेली थप्पड असल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिली.