‘देहभान विसरूनी, नागपूरकरांची सायकल वारी चालली पंढरपूरी

नागूपर - "विठोबाच्या रूपाला डोळ्यांत साठवत..." जयघोषात नागपूर ते पंढरपूर सायकल वारीची उत्साहात सुरुवात झाली. पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती आणि इंधन बचतीचा संदेश घेऊन ही वारी रवाना झाली आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर टायगर ग्रुप ऑफ अॅडव्हेंचर आणि क्रीडाभारतीच्या संयुक्त विद्यमाने १५ ते २० जूनदरम्यान ही सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये १३ ते ८५ वयोगटातील एकूण ८५ सायकलपटू सहभागी असून, यातील ४५ जण नागपूरचे आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्धा रोडवरील एनरिको हाइट्स येथून हिरवा झेंडा दाखवून वारीला शुभेच्छा दिल्या. एकूण ७५० किमी अंतर पार करत सायकलपटू पंढरपूर गाठणार आहेत.
ही वारी चौथ्यांदा आयोजित करण्यात आली असून नागपूर, भंडारा, यवतमाळ, आर्णी, नांदेड आणि उदगीर येथील महिला, युवक आणि ज्येष्ठ सायकलप्रेमींनी यात सहभाग घेतला आहे. सहभागी संस्थांमध्ये टायगर सिटी सायकलिंग असोसिएशन, द सायकलिस्ट असोसिएशन, बायसिकल असोसिएशन, आर्णी सायकलिंग क्लब, संडे सायकलिंग क्लब, सृष्टी सौंदर्य बहुद्देशीय संस्था आणि उदगीर सायकलिंग क्लब यांचा समावेश आहे.
पंढरपूरात २२ जूनला सायकल संमेलन व रिंगण सोहळा -
राज्यभरातील ८२ सायकल क्लबचे सुमारे साडेतीन हजार सायकलपटू २२ जून रोजी पंढरपुरात एकत्र येणार असून, पारंपरिक वारकऱ्यांप्रमाणे रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सायकल रॅली, पुरस्कार वितरण व विविध उपक्रम राबवले जातील.
सर्व सरकारी यंत्रणांनी वारीमध्ये समन्वय ठेवावा - उपमुख्यमंत्री अजित पवार
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा ६ जुलै रोजी होत असून २६ जून ते १० जुलै या काळात यात्रा आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी सर्व मानाच्या व अन्य पालख्यांचे त्यांच्या नियोजित तिथीप्रमाणे पंढरपूरकडे प्रयाण होणार आहे. संपूर्ण वारी कालावधीत पालख्या, दिंड्या त्यांच्या समवेत असणारे वारकरी, भाविक यांना पालखी मार्ग, पालखी तळ, पालखी विसावा ठिकाण, रिंगण व पंढरपूर शहरात सर्व प्रकारच्या उत्कृष्ट सोयीसुविधा संबंधित प्रशासकीय यंत्रणेने अत्यंत काटेकोरपणे उपलब्ध करून द्याव्यात, त्यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवावा व ही आषाढी वारी निर्विघ्नपणे पार पाडावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.