बांगलादेशात राजकीय हिंसाचार वाढला ; युवा नेत्यावर केला गोळीबार
बांगलादेश - बांगलादेशचे विद्रोही नेते शरीफ उस्मान बिन हादी यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर अनेक शहरांमध्ये जाळपोळ, आंदोलन आणि हिंसाचार सुरू असून काही ठिकाणी हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याचेही समोर येत आहे. अशाच पार्श्वभूमीवर आता आणखी एका युवा राजकीय नेत्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मुहम्मद मोतलेब सिकदार असे जखमी झालेल्या नेत्याचे नाव असून ते बांगलादेश नॅशनल पार्टीच्या खुलना विभागाचे प्रमुख आहेत. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर सिकदार यांना तातडीने खुलना मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत होते.

मुहम्मद मोतलेब सिकदार हे खुलना येथील सोनादनगा शेखपुरा परिसरातील रहिवासी असून त्यांचे वय ४२ वर्षे आहे. ते नॅशनल सिटीझन पार्टी (NCP) च्या खुलना विभागाचे प्रमुख असून, पक्षाच्या श्रमिक शक्ती विंगचे केंद्रीय समन्वयक म्हणूनही ते कार्यरत आहेत. एनसीपीच्या प्रमुख समन्वयक महमुदा मिटू यांनी फेसबुक पोस्टद्वारे सिकदार यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती दिली. पोलीस अधिकारी अनिमेश मंडल यांच्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ११.४५ वाजता गाझी मेडिकल कॉलेजजवळ हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्याच्या दिशेने गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने सिकदार सध्या धोक्याबाहेर आहेत. गोळी त्यांच्या कानाजवळून आत शिरून दुसऱ्या बाजूने बाहेर गेली, त्यामुळे गंभीर इजा टळली. दरम्यान, शरीफ उस्मान बिन हादी यांच्या हत्येनंतर बांगलादेशातील राजकीय तणाव अधिक तीव्र झाला आहे. हादी हे २०२४ च्या आंदोलनातील प्रमुख चेहरा होते आणि विद्यार्थी नेतृत्वाखालील ‘इन्कलाब मंच’चे वरिष्ठ नेते होते. ते माजी पंतप्रधान शेख हसिना यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते.
१२ डिसेंबर रोजी ढाका येथील एका मशिदीतून बाहेर पडताना हादी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर उपचारासाठी त्यांना सिंगापूरला एअरलिफ्ट करण्यात आले, मात्र गेल्या गुरुवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशचे काळजीवाहू पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी ही देशासाठी न भरून येणारी हानी असल्याचे म्हटले असून, देशभर विशेष दुखवटा आणि प्रार्थना करण्याचे आदेश दिले आहेत.




