खेबवडे येथील विठलाई यात्रेनिमित्त 16 मार्च रोजी जंगी कुस्त्यांचे मैदान
कोल्हापूर (प्रतिनिधी):कुस्तीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेले करवीर तालुक्यातील दूधगंगा काठावर वसलेले समृद्ध असे खेबवडे गाव. या गावामध्ये गेली 50 वर्षे झाली लाल मातीची सेवा करणारे वाडकर कुटुंबीय. कै पैलवान बळवंतराव वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेबवडे गावामध्ये कुस्तीचे मैदान घेण्यास सुरुवात झाली, त्यानंतर त्यांचे सुपुत्र माजी सरपंच पैलवान सुभाषराव वाडकर यांनी ही कुस्तीची परंपरा मोठ्या प्रमाणावर सुरू ठेवलीय, गेली 50 वर्षे झाली देशातील नामवंत पैलवान या खेबवडेच्या मैदानावर खेळले आहेत. आज त्यांची तिसरी पिढी त्यांच्या साथीने कार्यरत आहे.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर व प्रशांत वाडकर यांच्या रूपाने तिसरी पिढी लाल मातीची सेवा करत आहेत.दिनांक 16 मार्च रोजी विठ्ठलाई देवीच्या यात्रेनिमित्ताने 44 वे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व उत्तर प्रदेश केसरी आदिनाथ सिंह यांच्यात प्रथम क्रमांकाची लढत होणार असून अशाच 100 च्या वर चटकदार कुस्त्यांचे मैदान पार पडणार आहे. हे कुस्त्यांचे मैदान शाहू मैदान सुभाष नगर, खेबवडे ता. करवीर येथे दुपारी तीन वाजता होणार आहे.तरी भागातील क्रीडा व कुस्तीप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




