कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला 'अधिकार प्रदत्त स्वायत्तता'; पदवी प्रमाणपत्रावर आता महाविद्यालयाचे नाव!
कोल्हापूर/प्रतिनिधी : कसबा बावडा येथील नामांकित 'डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी' या महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिवाजी विद्यापीठाने २१ जुलै २०२६ रोजीच्या अधिकृत पत्राद्वारे या संस्थेला 'अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय' (Empowered Autonomous Status) हा विशेष दर्जा प्रदान केला आहे. या ऐतिहासिक मान्यतेमुळे आता विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पदवी प्रमाणपत्रावर शिवाजी विद्यापीठासोबतच डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे नावदेखील अधिकृतपणे नमूद केले जाणार आहे.

या विस्तारित स्वायत्ततेमुळे महाविद्यालयाला राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (NEP) अनुषंगाने अभ्यासक्रम रचना, कौशल्याधारित शिक्षण, मूल्यमापन पद्धती, आंतरविद्याशाखीय संशोधन आणि उद्योग-सहभाग अधिक प्रभावीपणे राबविण्याचे स्वातंत्र्य व अधिकार प्राप्त झाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी मोठे बळ मिळणार आहे.
शैक्षणिक उत्कृष्टतेचा गौरव:
संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी हा टप्पा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड असल्याचे सांगत शैक्षणिक निर्णय अधिक वेगाने होतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी, उद्योग-संलग्न उपक्रम व संशोधनावर अधिक भर देऊन सर्वोच्च गुणवत्ता जपणार असल्याचे नमूद केले.
४२ वर्षांचा उज्ज्वल वारसा:
या यशाबद्दल अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांनी सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.




