कोल्हापूर पालिकेची धडक कारवाई ! माळकर तिकटी ते बिंदू चौक परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम; दोन प्रसिद्ध लॉजिंग सील
कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले आणि अतिक्रमणांविरोधात आज धडक कारवाई केली आहे. महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक २ आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज माळकर तिकटी, मटण मार्केट, गंजी गल्ली ते थेट बिंदू चौक परिसरात जोरदार मोहीम राबवली. या मोहिमेमुळे परिसरात व्यापाऱ्यांची एकच धांदल उडाली.

या धडक कारवाईतील सर्वात मोठी बातमी म्हणजे, बिंदू चौक परिसरातील 'प्राईम रेसीडन्सी' आणि 'हिंद लॉजिंग' या दोन प्रसिद्ध लॉजिंगचे परवाने तपासले असता ते विनापरवाना सुरू असल्याचं समोर आलं. प्रशासनाने कोणतीही हयगय न करता ही दोन्ही लॉजिंग तातडीने सील केली आहेत
या कारवाई दरम्यान रस्त्यावरील शेकडो अनधिकृत साहित्याचा पालापाचोळा करण्यात आला. यामध्ये ३४ लोखंडी पाईप, ३९ लोखंडी पत्रे, हातगाड्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे सर्व साहित्य महापालिकेने 'कायमस्वरूपी' जप्त केले असून ते आता संबंधितांना कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही.
ही धडक कारवाई महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या थेट आदेशानुसार करण्यात आली. उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्यासह मोठा प्रशासकीय फौजफाटा आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे ३० पोलीस कर्मचारी यावेळी घटनास्थळी तैनात होते.
महापालिकेने आता शेवटचा इशारा दिलाय की, रस्त्यावरील अतिक्रमण स्वतःहून हटवा, अन्यथा यापुढील कारवाई अधिक तीव्र असेल.




