भंगारात निघालेल्या आणखीन दोन आरसी गाड्यांचं अतिक्रमण निर्मूलन ट्रकमध्ये रूपांतर
कोल्हापूर (प्रतिनिधी) :"टाकाऊतून टिकाऊ" या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यशाळा विभागाने एक आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी २०१६ साली घेतलेल्या आणि सध्या भंगारात निघालेल्या आरसी गाड्यांना वर्कशॉप मधील कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कौशल्याने नवसंजीवनी दिली. या गाड्यांचे रूपांतर आता महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागासाठी उपयुक्त अशा ट्रकमध्ये करण्यात आले आहे. यापुर्वीही अशाच दोन गाडयांचे अतिक्रमण निर्मुलन ट्रकमध्ये केले होते. या गाडया अनुक्रमे विभागीय कार्यालय क्र.1 व 2 ला दिल्या आहेत. आता या आणखीन नव्याने तयार करण्यात आलेल्या दोन गाडया अनुक्रमे विभागीय कार्यालय क्र.3 व 4 ला दिल्या जाणार आहेत.

विशेष म्हणजे या संकल्पनेचे जनक स्वतः आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड हेच आहेत. आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांनी कार्यशाळा विभागास भेट दिली त्यावेळी या गाडया भंगारात न घालता याचा अतिक्रमणासाठी वापर करता येईल का याची कल्पना मांडली. त्यानुसार सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील व कार्यशाळा विभागाचे प्रमुख संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यशाळा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी या गाड्या तयार केल्या आहेत. भंगारात निघालेल्या गाड्यांचं इंजिन, बॉडी, हायड्रोलिक सिस्टीम अशा सर्व बाबी वर्कशॉपमध्येच दुरुस्त करून अतिक्रमण हटाव कारवाईसाठी आवश्यक त्या रचनेत बदल करण्यात आला आहे.
आज या दोन नूतनीकरण्यात आलेल्या गाड्यांचे उद्घाटन महापौर रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, उप-सभापती दिपा ठाणेकर, प्रभाग समिती सभापती अनुराधा खेडकर, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले व नगरसेविका उपस्थित होते.




