जंतरमंतर मधील "विद्यार्थी'आतंकवादी? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामावर सदाभाऊ खोतांची टिप्पणी

जंतरमंतर मधील "विद्यार्थी'आतंकवादी? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामावर सदाभाऊ खोतांची टिप्पणी

मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या CJPच्या आंदोलनाने सोमवारी उग्र वळण घेतले. संसदेकडे मोर्चा काढण्याच्या प्रयत्नादरम्यान दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना रोखत लाठीचार्ज केला. या घटनेनंतर अनेक आंदोलक जखमी झाल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणावर देशभरातून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांवर कठोर शब्दांत टीका केली. पेपरफुटी प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई होत असल्याचे सांगत त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली. तसेच काही आंदोलकांना "आतंकवादी प्रवृत्तीचे"असे संबोधत सरकारने कोणत्याही दबावाला बळी पडू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मात्र त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. आमदार बच्चू कडू यांनी विद्यार्थ्यांना अशा प्रकारची उपमा देणे चुकीचे असल्याचे सांगत सदाभाऊ खोत यांनी आपले विधान मागे घ्यावे, अशी मागणी केली. आंदोलन हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई यांनीही लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार मान्य असला तरी हिंसक प्रकारांचे समर्थन करता येणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र आंदोलक विद्यार्थ्यांना थेट "आतंकवादी" म्हणणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण आणखी तापले असून, या वादावर पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.