तुकाराम मुंडेंची धडाकेबाज अॅक्शन! 'यल्ला यल्ला' आणि 'आईच्या गावात' हॉटेलचे परवाने निलंबित
मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यभर सुरू असलेल्या "सेफ फूड, सेफ महाराष्ट्र" मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने शहरातील दोन नामांकित हॉटेल्सवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर 'यल्ला यल्ला' आणि 'आईच्या गावात' या दोन्ही हॉटेल्सचे अन्न परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहेत.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या तपासणीत 'यल्ला यल्ला' रेस्टॉरंटच्या किचनमध्ये गंभीर अनियमितता आढळून आल्या. बटर चिकन, कबाब आणि चिकन लॉलीपॉप यांसारखे पदार्थ अधिक आकर्षक दिसावेत म्हणून त्यांच्या ग्रेव्हीत मोठ्या प्रमाणावर सिंथेटिक फूड कलरचा वापर केला जात असल्याचे पथकाने निदर्शनास आणले. यावेळी 20 ते 25 डबे रासायनिक रंग जप्त करून नष्ट करण्यात आले.
दरम्यान, 'आईच्या गावात' रेस्टॉरंटमध्येही ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप आहे. मेनूकार्डवर 'बटर नान' असा उल्लेख करून प्रत्यक्षात वेजिटेबल फॅट स्प्रेड वापरून नान दिली जात असल्याचे तपासात समोर आले. तसेच स्टोअर रूममध्ये बुरशी लागलेले आंबे आणि सडलेल्या पालेभाज्या आढळल्याने अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्या कथित उल्लंघनाप्रकरणी एफडीएच्या पथकाने ही कारवाई केली असून संबंधित अधिकाऱ्यांनी दोन्ही हॉटेल्सचे परवाने तातडीने निलंबित केले आहेत.ग्राहकांच्या आरोग्याशी कोणताही तडजोड करणाऱ्यांना माफी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे राज्यातील इतर हॉटेल चालकांमध्येही खळबळ उडाली आहे.




