मनोज जरांगेंविरुद्ध थेट ED मध्ये तक्रार; वाळू तस्करीसह कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, अजय बारसकर आक्रमक
मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण अभ्यासक अजय बारसकर हे मनोज जरांगे यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. आता अजय बारसकर यांनी थेट ईडीमध्ये मनोज जरांगे यांच्याविरुद्ध तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. अजय बारसकर यांनी ईडी कार्यालयाबाहेरून याबाबतची माहिती दिली आहे. बारसकर म्हणाले, “मनोज जरांगे आणि त्यांचे जे सर्व सहकारी आहेत, त्या सर्वांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आणि अवैध संपत्ती कमावली, असा माझा आरोप आहे. मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या कथित काळ्या धंद्याविरोधात मी प्रवर्तन निदेशालय म्हणजेच ईडीकडे अधिकृतपणे तक्रार केली आहे.”

“मला ईडी कार्यालयाकडून बोलावणं आलं होतं. मी ईडी कार्यालयात जाऊन डेप्युटी डायरेक्टर यांच्याकडे माझी संपूर्ण बाजू मांडली. त्यांच्याशी संबंधित काही पुरावे माझ्याकडे उपलब्ध होते, ते सर्व मी ईडीकडे दिले,” असंही अजय बारसकर यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या नावाखाली मनोज जरांगे यांचे जे काही सहकारी आहेत, त्यांच्याबाबतही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बारसकर यांनी केली आहे. यामध्ये पांडुरंग तारक, ईश्वर बलांडे, गंगाधर काळकुटे, श्रीराम पुरणकर, संजय कटारे, स्वप्नील तारक, बद्रीनाथ तारक आणि त्यांचा मेहुणा विलास खेडकर यांच्यासह इतर अनेक नावांचा उल्लेख त्यांनी केला आहे.
“वाळूचा माफिया हा त्यांचा सगळ्यात मोठा धंदा आहे, असा माझा आरोप आहे. ईडीकडे वाळूच्या धंद्याच्या बाबतीत कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्यांनी कोट्यवधी रुपयांचा, कल्पनाही करता येणार नाही इतक्या मोठ्या रकमेचा, कमीत कमी हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा माझा आरोप आहे. याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी आणि त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा,” अशी मागणी अजय बारसकर यांनी केली आहे. या सर्व लोकांना, गंगाधर काळकुटे असतील, तारक असतील किंवा इतर संबंधित व्यक्ती असतील, त्यांना चौकशीसाठी बोलवावं. त्यांच्या सर्व संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
“डिफेंडर गाड्या कुठून आल्या? लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पैसे कुठून येतात? पांडुरंग तारक यांनी 50 एकर जमीन घेतली, 28 एकर जमीन घेतली, या सर्व विषयांची चौकशी व्हावी. यासाठीच आम्ही ईडीच्या कार्यालयात आलो आहोत,” अशी माहितीही अजय बारसकर यांनी दिली आहे.आता अजय बारसकर यांनी ईडीकडे केलेल्या या तक्रारीनंतर मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत पुढे काय कारवाई होते, याकडे लक्ष लागलं आहे.




