विद्यार्थ्यांवरील लाठीमारावर राहुल गांधी आक्रमक; PM मोदी, अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी

विद्यार्थ्यांवरील लाठीमारावर राहुल गांधी आक्रमक; PM मोदी, अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागलं. संसदेच्या दिशेने मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. या कारवाईत अनेक आंदोलक जखमी झाले. या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई अत्यंत निंदनीय असल्याचं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी केली. तसेच गृहमंत्री अमित शाह आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

राहुल गांधी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे चर्चेची मागणी केली होती. मात्र चर्चेसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते, ही परिस्थिती विचार करण्यासारखी आहे. विद्यार्थ्यांना झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे. कालच्या घटनेवर पंतप्रधान मोदी अद्याप शांत का आहेत? त्यांनी माफी का मागितलेली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुढे राहुल गांधी म्हणाले की, "विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करत आहेत आणि त्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे. तरुण आंदोलकांशी अशा पद्धतीने वागणं योग्य नाही. सरकारने यंत्रणांचा वापर करून विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न थांबवावा."

यावेळी राहुल गांधी यांनी देशातील तरुणांच्या भविष्याचा मुद्दाही उपस्थित केला. "आज अनेक तरुण आपल्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. त्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे," असं त्यांनी म्हटलं.दरम्यान, राहुल गांधी यांच्या या आरोपांवर सत्ताधारी भाजपकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.