रशियाचं तेल घ्या म्हणून भारतासह जगाला विणवण्या, इराणच्या विदेश मंत्र्यांचं ट्रम्प यांच्या वर्मावर बोट
नवी दिल्ली (प्रतिनिधी) : अमेरिका- इस्त्रायल आणि इराण युद्धाला आता 14 दिवस पूर्ण झाले आहेत. इराणकडून अजूनही अमेरिकेचा प्रतिकार केला जातोय, त्यामुळं युद्ध कधी संपणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. इराणचे विदेश मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी अमेरिकेच्या वर्मावर बोट ठेवणारी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अराघची यांनी अमेरिकेनं रशियाचं तेल भारतासह इतर देशांनी करु नये म्हणून धमकावण्यात महिने घालवले. आता अमेरिकाच रशियाचं तेल खरेदी करा म्हणून भारतासह इतरांकडे भीक मागत असल्याचं अराघची यांनी म्हटलं आहे.

इराणचे विदेशमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी म्हटलं की अमेरिकेनं भारतानं रशियाकडून तेल आयात बंद करावी यासाठी धमकावण्यामध्ये महिने घालवले. इराणविरुद्ध दोन आठवडे युद्ध सुरु राहिल्यानंतर आता व्हाईट हाऊस आता जगाला ज्यात भारताचा समावेश होतो, या सर्वांकडे रशियन तेल खरेदी करावं,अशी भीक मागत आहे.अब्बास अराघची यांनी या पोस्ट द्वारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्य वर्मावर बोट ठेवलं आहे.
अमेरिकेनं भारताला 5 मार्चपासून एका महिन्याच्या कालवधीसाठी रशियन तेल खरेदीची परवानगी दिली आहे. याशिवाय अमेरिकेनं व्यापार करारावेळीच भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं अतिरिक्त टॅरिफ कमी केलं आहे.
इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेनं इराणविरुद्ध सुरु केलेलं युद्ध बेकायदेशीर असल्याचं म्हटलं. अराघची पुढं म्हणाले की यूरोपमधील देशांना असं वाटत होतं की अमेरिकेला इराण विरोधात पाठिंबा दिल्यास, अमेरिका रशिया विरोधात आपल्याला पाठिंबा देईल. अब्बास अराघची यांनी रशियन तेलाबाबतची अमेरिकेची सध्याची अवस्था केविलवाणी असल्याचं देखील म्हटलं.
दरम्यान, भारताचे विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी अब्बास अराघची यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली होती. अमेरिका आणि इस्त्रायलनं इराण विरोधात युद्ध सुरु केल्यानंतरची ही चौथी चर्चा होती. भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ देण्यासाठी चर्चा सुरु आहेत. काल, इराणकडून दोन भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ देण्यास परवानगी दिल्याचं समोर आलं होतं.




