"देशाला अशिक्षित ठेवून 'अंधभक्त' बनवण्याचा भाजपचा डाव!"आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; 'शिवतीर्था'वरून एल्गार

"देशाला अशिक्षित ठेवून 'अंधभक्त' बनवण्याचा भाजपचा डाव!"आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; 'शिवतीर्था'वरून एल्गार

मुंबई : "देशातील जनतेला शिक्षणापासून वंचित ठेवणे, देशाला अशिक्षित ठेवणे आणि लोकांना अंधभक्त बनवणे, हाच भाजपचा एककलमी कार्यक्रम आहे. पण आम्ही जर भक्त राहू, तर ते या देशाच्या मातीचे, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांचे राहू. आम्हाला कापले तरी आम्ही भाजपचे गुलाम होणार नाही आणि त्यांच्यासमोर झुकणार नाही!" अशा अत्यंत आक्रमक आणि ज्वलंत शब्दांत युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र राज्य सरकारवर तोफ डागली.

लडाखचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (UBT) तर्फे मुंबईतील ऐतिहासिक शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीच्या जंतरमंतरवर २० दिवस उपोषणाला बसलेल्या वांगचुक यांना २१ व्या दिवशी प्रशासनाने बळजबरीने रुग्णालयात दाखल केले. सरकारच्या या दडपशाहीविरोधात आणि 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या निषेधार्थ हजारो नागरिकांनी या सभेला हजेरी लावली होती.

शिक्षण व्यवस्थेच्या चिंधड्या; भाजपला शिक्षणाचे वावडे!

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणाऱ्या खेळfilter वर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "आज देशातील तरुण आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या परीक्षेचा पेपर फुटतोच. कधी 'नीट'चा पेपर लीक होतो, तर कधी 'टीईटी'चा! विद्यार्थ्यांना आपल्या हक्कांसाठी प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागते. महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये आज वीज नाही, स्वच्छतागृहे नाहीत, शाळांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या सरकारला देशातील शिक्षणाची कोणतीही पडलेली नाही."

मंदिर लुटणारे आता विद्यार्थ्यांना लुटतायत!

सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करताना त्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. "आता शांत बसण्याची वेळ निघून गेली आहे. देशाचे भवितव्य वाचवण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र यावेच लागेल. भाजपसारख्या देशविरोधी पक्षाला सत्तेबाहेर काढणे ही काळाची गरज आहे. मंदिरांच्या नावावर लुटणारे आता देशातील विद्यार्थ्यांना लुटत आहेत, तर दुसरीकडे इथेनॉलच्या माध्यमातूनही मोठी लूट सुरू आहे. ही चाललेली लूट आपल्याला कोणत्याही परिस्थितीत थांबवावीच लागेल," असा निर्धार आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.

या आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. जंतरमंतरवर वांगचुक यांच्यानंतर आता सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दिपके यांनी उपोषण सुरू ठेवले असून, या आंदोलनाची धग मुंबईपर्यंत पोहोचल्याचे आज शिवतीर्थावर पाहायला मिळाले.