मदत फाउंडेशनकडून जुळ्या चिमुरड्यांच्या उपचारासाठी ६१ हजारांची आर्थिक मदत

मदत फाउंडेशनकडून जुळ्या चिमुरड्यांच्या उपचारासाठी ६१ हजारांची आर्थिक मदत

कोल्हापूर/प्रतिनिधी : जन्मतःच मृत्यूशी झुंज देणाऱ्या जुळ्या नवजात बालकांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी कोल्हापूरच्या 'मदत फाउंडेशन'ने अत्यंत संवेदनशीलतेने पुढाकार घेतला आहे. फाउंडेशनच्या वतीने या चिमुरड्यांच्या उपचारासाठी ६१ हजार रुपयांची भरीव आर्थिक मदत देऊन त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा दिला. 

खडकलाट (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथील रहिवासी तुषार तानाजी काटे यांच्या पत्नी स्नेहल काटे यांची मार्च महिन्यात प्रसूती झाली. त्यांना जुळी अपत्ये झाली, मात्र जन्माच्या वेळी दोन्ही बाळांचे वजन अत्यंत कमी आणि प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील 'साईस्पर्श हॉस्पिटल'मध्ये दाखल करण्यात आले.

काटे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने 'साईस्पर्श हॉस्पिटल'च्या वैद्यकीय टीमने देखील भूतदयेच्या भावनेतून बिल कमी करत या कुटुंबाला मोठी सवलत दिली. याच दरम्यान, मदतीचा हात म्हणून 'मदत फाउंडेशन'चे अध्यक्ष मदन पाटील, उपाध्यक्ष डॉ. विजय गावडे आणि सचिव प्रशांत साळुंखे यांनी एकत्रितपणे ६१ हजार रुपयांचा धनादेश बालकांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला. या संकटसमयी मिळालेल्या या मदतीमुळे काटे कुटुंबाने फाउंडेशन आणि रुग्णालयाचे आभार मानले आहेत.