मुंबईत CJP आंदोलनावर पोलिसांची मोठी कारवाई; 8 ठाण्यांत गुन्हे, 900 पेक्षा जास्त आंदोलकांवर FIR
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील 8 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, 900 हून अधिक आंदोलकांविरोधात FIR नोंदवण्यात आली आहे. परवानगीशिवाय आंदोलन करणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा भंग केल्याचा आरोप या आंदोलकांवर ठेवण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सर्वाधिक 600 हून अधिक आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय माहिममध्ये 100 पेक्षा अधिक, दादरमध्ये 70 पेक्षा अधिक, सायनमध्ये 40 पेक्षा अधिक, तर वरळी, काळाचौकी, भोईवाडा आणि वडाळा टीटी पोलीस ठाण्यांमध्येही अनेक आंदोलकांविरोधात स्वतंत्र FIR नोंदवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दादरच्या चैत्यभूमीवर झालेल्या आंदोलनासंदर्भात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, 50 हून अधिक आंदोलकांना आरोपी करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या आंदोलनासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून, सर्व प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.




