अदिती तटकरेंच्या PROचा दुर्दैवी मृत्यू; जेवणानंतर चालताना अचानक कोसळले अन्.. नेमकं काय घडलं?
मुंबई (प्रतिनिधी) : महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयात बाह्य यंत्रणेद्वारे PRO म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आशिष मेटे असं मृत तरुणाचं नाव आहे. भांडुप परिसरातील एका इमारतीच्या आवारात जेवण झाल्यानंतर फिरत असताना आशिष मेटे अचानक जमिनीवर कोसळले. खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आशिष मेटे यांनी जेवण केल्यानंतर इमारतीच्या आवारात चालण्यास सुरुवात केली होती. चालत असतानाच ते अचानक खाली कोसळले. जमिनीवर पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याची माहिती आहे. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं.आशिष मेटे हे मंत्री अदिती तटकरे यांच्या थेट सरकारी सेवेत कार्यरत नव्हते. ते एका जनसंपर्क कंपनीच्या माध्यमातून बाह्य यंत्रणेद्वारे PRO म्हणून काम पाहत होते, अशी माहिती समोर आली आहे. मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयाशी संबंधित प्रसिद्धी आणि जनसंपर्काची कामं ते हाताळत होते.
या घटनेनंतर भांडुप पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेची प्राथमिक चौकशी सुरू केली असून आशिष मेटे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.आशिष मेटे अचानक का कोसळले आणि त्यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून परिसरातील नागरिकांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे.




