जिल्हा बँकेसाठी सुरेश नलवडे मजूर संघाचे प्रतिनिधी; सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव

जिल्हा बँकेसाठी सुरेश नलवडे मजूर संघाचे प्रतिनिधी; सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा प्रतिनिधी म्हणून सुरेश नलवडे यांचे नाव पाठविण्याचा ठराव आज सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच इतर विविध विषयांवरील ठरावही यावेळी सर्वसंमतीने संमत झाले.रमण मळा येथील बहुउद्देशीय सभागृहात मजूर संघाची ५५ वी सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्षस्थानी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष युसूफ शेख होते.

सभेमध्ये व्यवस्थापक अजिंक्य शिंदे यांनी ठरावांचे वाचन केले. जिल्हा बँक निवडणुकीसाठी प्रतिनिधी म्हणून सुरेश नलवडे (कृष्णकमळ मजूर संस्था, मिणे खुर्द, ता. भुदरगड) यांचे एकमेव नाव अंतिम करण्यात आले. यासाठी सूचक आप्पासाहेब पाटील व अनुमोदक भीमराव नलवडे होते.

सभेत युसूफ शेख यांनी संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेतला. आप्पासाहेब पाटील यांनी 'खाण मजूर संस्था कमी करण्यात येऊ नयेत, तसेच इतर मजूर संस्था योग्य काम करतात का? याची प्रशासनाने शहानिशा करावी,' अशी सूचना मांडली. यावर मुकुंद पवार यांनी, "खाण मजूर हा संघाचा आत्मा असून त्यांना कमी करू नये," असे स्पष्ट केले.

याशिवाय लेखापरीक्षण अहवालानुसार वर्गणी वसुली, ॲडव्हान्स वसुली आणि एकूण खर्चाच्या त्रुटींबाबत केलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश सुरेश पाटील आणि नारायण देसाई यांनी दिले. अ‍ॅड. शाहू काटकर व जयसिंग पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी यशवंत पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या प्रसंगी मंडळाचे सदस्य राहुल पवार, कृष्णात शिंदे यांच्यासह संघाचे प्रमुख पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.