‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला नरेंद्र मोदींचा फोटो कशासाठी?; अमित ठाकरेंचा मुख्याध्यापकांना सवाल, अन् पुढच्याच क्षणी फोटो हटवला
पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा दौरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अमित ठाकरे सोमवारी शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात गेले होते. यावेळी अमित ठाकरे यांनी कँटिनमधील जेवण आणि स्पोर्ट्स कोट्यातील खेळाडूंसाठी प्रशिक्षक नसल्याच्या मुद्द्यावरून महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना जाब विचारला. अमित ठाकरे मुख्याध्यापकांच्या कार्यालयात उभे असताना एका विद्यार्थ्याने त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे.

तेव्हा अमित ठाकरे यांनी "छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशाला?" असा सवाल मुख्याध्यापकांना केला. एवढंच नव्हे, तर पुढच्याच क्षणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो तिथून खाली उतरवला.या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकारावरून पुण्यातील भाजप नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.
अमित ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदींचा फोटो काढण्याच्या कृतीचं समर्थन केलं. "एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो लावल्याचं माझ्या लक्षात आणून दिलं. मोदींना एवढ्या थराला नेऊन ठेऊ नका. नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी होऊ शकत नाही."
"शासकीय महाविद्यालयात पंतप्रधानांचा फोटो लावण्याचा प्रोटोकॉल असेल, पण मग मोदींचा फोटो दुसरीकडे लावा. तो फोटो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला नको. भाजपचे नेते याचा निषेध करत असतील तर त्यांना विचारा की, तुम्हाला छत्रपती शिवराय आणि मोदींची तुलना मान्य आहे का? आम्ही महाराजांचा अपमान सहन करणार नाही," असं अमित ठाकरे यांनी म्हटलं.
"उद्या तुम्ही देवघरात मोदींचा फोटो लावाल. मोदी आणि शिवरायांचा फोटो बाजूला लावण्याच्या निर्णयाचं समर्थन भाजपचे नेते तरी करणार आहेत का?" असा प्रतिसवालही अमित ठाकरे यांनी केला.दरम्यान, भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी अमित ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान करण्याचं काम अमित ठाकरे यांनी केलं आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. सरकारी कार्यालयात प्रोटोकॉल असतो. मोदींचा फोटो काढण्यापूर्वी अमित ठाकरेंनी प्रोटोकॉल वाचायला हवा होता."
"ते मनसेचे नवीन नेते आहेत. ते नव्याने घराच्या बाहेर पडले आहेत. घरात बसणाऱ्यांना प्रोटोकॉल माहिती नसतो," असा टोला नवनाथ बन यांनी लगावला.अमित ठाकरे हे पुण्यातील एकूण सात महाविद्यालयांना भेट देऊन Gen Z विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी, शैक्षणिक प्रश्न आणि अपेक्षा जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी संबंधित विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये ‘शैक्षणिक भ्रष्टाचार दहीहंडी’, विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी ‘रक्षाबंधन’, वाडिया महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांसमोर सर्रासपणे होणाऱ्या सिगारेट आणि गुटखा विक्रीविरोधात कारवाईची मागणी, तसेच माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.या दौऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळवून देण्याचा आणि त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनीही या प्रकारावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "तो फोटो नरेंद्र मोदींचा नसून तो भारताच्या पंतप्रधानांचा फोटो आहे. प्रोटोकॉलनुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे फोटो लावणे बंधनकारक असते.""कदाचित अमित ठाकरेंना हे माहिती नसेल की प्रोटोकॉल काय असतो किंवा ते या देशाच्या पंतप्रधानांनाच मानत नसतील. त्यांच्या या कृत्याचा मी निषेध करतो. पंतप्रधान हे घटनात्मक पद आहे. ते कुठल्या पक्षाचे नसतात, देशाचे पंतप्रधान असतात," असं गणेश बीडकर यांनी म्हटलं आहे.




