‘माझ्या पोटात अन्नाचा कण नाही, तरी शुगर जास्त कशी?’; मनोज जरांगेंनी रिपोर्टवर संशय घेतला, डॉक्टरांनी दिलं स्पष्ट उत्तर

‘माझ्या पोटात अन्नाचा कण नाही, तरी शुगर जास्त कशी?’; मनोज जरांगेंनी रिपोर्टवर संशय घेतला, डॉक्टरांनी दिलं स्पष्ट उत्तर

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी तब्बल 11व्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारलं आहे. अंतरवली सराटी येथे जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली असून, आज (31 ऑगस्ट) त्यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे.

अशातच आज डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांची ब्लड शुगर वाढल्याचं आढळून आलं आहे. मात्र, वाढलेल्या ब्लड शुगर पातळीवरून मनोज जरांगे यांनी प्रश्न उपस्थित करत संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आता त्यांच्या या शंकेवर डॉक्टरांच्या पथकाने स्पष्टीकरण दिलं आहे.मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मात्र, उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी ब्लड शुगर लेवल कमी होण्याऐवजी वाढत असल्याने त्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

"माझ्या पोटात अन्नाचा कण नाही, तरीही शुगर जास्त कशी?" असा सवाल करत मनोज जरांगे यांनी हा सरकारचा काही कट किंवा षडयंत्र तर नाही ना, असा संशयही व्यक्त केला होता.दरम्यान, जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या या शंकेवर डॉक्टरांच्या पथकाने प्रतिक्रिया दिली आहे. उपोषणादरम्यान ब्लड शुगर लेवलमध्ये झालेली वाढ ही नॉर्मल गोष्ट असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

तसंच, याबाबत मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांचं समाधान केल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या ब्लड शुगर लेवल वाढण्याबाबतच्या शंकेचं डॉक्टरांच्या पथकाकडून निरसन करण्यात आलं आहे.मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी करणारे डॉ. अमोल खवले यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, ब्लड शुगरमध्ये झालेली वाढ ही चिंतेची बाब नसून त्याबाबत जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.