एकाच वेळी सर्व कामं सुरू असल्याने नाशिककरांना त्रास; आता लोक शिव्या घालतायत, पण.. फडणवीसांचं मोठं विधान

एकाच वेळी सर्व कामं सुरू असल्याने नाशिककरांना त्रास; आता लोक शिव्या घालतायत, पण.. फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई (प्रतिनिधी) : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आयोजित तीन दिवसीय ‘सिंहस्थ महा कुंभ भक्ती संगम’ कार्यक्रमात शुक्रवारी (दि. २८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी नाशिकमध्ये सध्या सुरू असलेल्या विकासकामांवर भाष्य केलं. एकाच वेळी अनेक कामं सुरू असल्याने नाशिककरांना त्रास होत असल्याची कबुली त्यांनी दिली. मात्र, ही कामं पूर्ण झाल्यानंतर हेच लोक आपलं स्वागत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विकासकामांवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एकाच वेळी सर्व कामं सुरू केल्यामुळे नाशिककरांना आणि त्र्यंबकमधील लोकांना त्रास होत आहे. लोकांच्या शिव्यादेखील आम्हाला खाव्या लागतात. गिरीश भाऊंना आणि दादा भुसे यांना जास्त शिव्या खाव्या लागतात, कारण ते इथे राहतात. आमदारांना आणि मंत्र्यांनाही शिव्या खाव्या लागतात. पण काळजी करू नका, कुठलाही बदल किंवा परिवर्तन आपण करतो तेव्हा शिव्या खाव्याच लागतात.”

“ज्या दिवशी ही सर्व कामं पूर्ण होतील, त्या दिवशी हीच मंडळी आपल्याला फुलांचे हार घालतील. चांगलं काम करताना दोन शिव्या खाण्याची तयारी ठेवावी. फक्त आपण जे काम करत आहोत ते जनहिताचं आणि पारदर्शक असलं पाहिजे. या दोन गोष्टी असतील, तर आपल्याला कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही,” असंही फडणवीस म्हणाले.दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कुंभमेळ्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत कामाच्या खर्चाबाबतचा रिपोर्ट जाहीर करण्याची मागणी केली होती. यावरही फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला.

“सगळे प्रोजेक्ट्स जाहीर आहेत, लपलेला एकही प्रोजेक्ट नाही. सगळे प्रोजेक्ट्स पब्लिक डोमेनमध्ये आहेत. त्यांनी सर्व चेक करून घ्यावेत. ज्यांच्या मनात भ्रष्टाचार आहे, ज्यांच्या आचरणात भ्रष्टाचार आहे, त्यांना रोज इथे येऊन भ्रष्टाचार दाखवायचा आहे,” असं फडणवीस म्हणाले.“ज्या ज्या ठिकाणी सनातन आणि हिंदू आस्था आहे, त्या ठिकाणी अशा पद्धतीने आरोप करायचे, खोटं बोलायचं आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा, हीच त्यांची स्ट्रॅटेजी आहे. पण त्यांनी कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी ‘ये पब्लिक है, ये सब जानती है’,” असा टोला फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला.