परदेश दौरे रद्द; मंत्र्यांच्या ताफ्यांचाही आढावा

परदेश दौरे रद्द; मंत्र्यांच्या ताफ्यांचाही आढावा

मुंबई (प्रतिनिधी) : मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आगामी सर्व परदेश दौरे रद्द करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जे दौरे मंजूर झालेले आहेत ते दौरे ही रद्द करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौरे टाळा,असं आवाहन केलं होतं. नरेंद्र मोदींच्या या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.आता विविध अभ्यासासाठी आणि कामासाठी परदेशात जाणारे मंत्री आणि अधिकारी यांचे दौरे रद्द करण्यात येणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अवाहनानंतर राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार आहे. कोणत्या मंत्र्यांच्या ताफ्यात किती वाहनं? याचा आढावा घेण्यात येणार आहे. ज्या मंत्र्यांच्या ताफ्यात अधिकची वाहनं आहेत ती कमी केली जाणार आहेत. अनेक मंत्रांच्या ताफ्यात अधिकची वाहनं असण्याची शक्यता आहे. सामान्य प्रशासन विभाग आता ही मोहीम हाती घेणार आहे. मतदार संघात जाताना अनेक मंत्र्यांच्या ताफ्यात वाहनांची रांगच रांग लागलेली असते. आता ही वाहनांची रांग कमी होणार आहे. तर अनेक मंत्र्यांनी आता इलेक्ट्रीकल वाहन खरेदी करायला सुरुवात केली असून पेट्रोल-डिझेल जपून वापरण्याच आवाहन पंतप्रधान यांनी केल्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय घेण्यात येत आहे. 

देशातील सध्याची कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे आणि खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राचे पर्यटन,खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याणमंत्री, पालकमंत्री, सातारा जिल्हा शंभूराज देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.देशहिताला प्राधान्य, जबाबदारीची जाणीव आणि साधेपणाचा संदेश देत शंभूराज देसाई यांनी माननीय पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात कौतुक होत आहे.

देशातील जनतेला इंधन बचतीचे आवाहन करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एक मोठा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या निम्मी केली आहे. याबाबत त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या 'स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप'ला (SPG) आदेश दिले आहेत. पंतप्रधानांनी आपल्या ताफ्यात 50 टक्के कपात केली आहे. वडोदरा आणि आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा यांच्या शपथविधीसाठी गेलेल्या गुवाहाटी दौऱ्यात पंतप्रधानांच्या ताफ्यात ही कपात दिसून आली. ताफ्यात इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर वाढवावा, मात्र त्यासाठी नवीन खरेदी करू नये, असे निर्देश एसपीजीला देण्यात आले आहेत.

नरेंद्र मोदींनी देशाला ..सोन्याची खरेदी टाळा,पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा,वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या,परदेश प्रवास टाळा,खाद्यतेलाचा वापर कमी करा,नैसर्गिक शेतीचा अवलंब करा,स्वदेशी उत्पादनं वापरा असं आवाहनं केल.