आज आम्हाला अटक होऊ शकते'; तरीही धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही, अभिजीत दीपकेंचा इशारा
मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान 'कॉकरोच जनता पार्टी'चे प्रमुख अभिजीत दीपके यांनी आंदोलनकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. आज आम्हाला अटक होण्याची शक्यता आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने सुरू ठेवा, असं त्यांनी म्हटलं.

दीपके यांनी स्पष्ट केलं की, आंदोलनाची एकमेव मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. जोपर्यंत राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, सरकार आणि 'कॉकरोच जनता पार्टी' यांच्यातील चर्चेची दुसरी फेरी आज होणार आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी झालेली चर्चा कोणताही तोडगा निघाला नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर चर्चेबाबत वेगवेगळे दावे करण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर, 'कॉकरोच जनता पार्टी'चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनीही सरकारवर निशाणा साधला. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. पंतप्रधानांना मध्यरात्री व्हिडिओ प्रसिद्ध करावा लागला, यावरून सरकारवर आंदोलनाचा दबाव असल्याचं दिसतं, असं त्यांनी म्हटलं.दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीविरोधात कठोर कायदा आणण्याचं आश्वासन दिलं आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, काही मेट्रो स्थानकांवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची चौकशी आणि विद्यार्थ्यांची जाहीर माफी या तीन मागण्यांचा पुनरुच्चार केला आहे.




