एकाच पायात बूट, छत्रसाल स्टेडियमवरून थेट संदेश; पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधी आक्रमक, मांडल्या ३ प्रमुख मागण्या!

एकाच पायात बूट, छत्रसाल स्टेडियमवरून थेट संदेश; पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधी आक्रमक, मांडल्या ३ प्रमुख मागण्या!

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सव्वा तीन तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर राहुल गांधी यांना छत्रसाल स्टेडियम येथील तात्पुरत्या नजरकैद केंद्रात नेण्यात आले.



छत्रसाल स्टेडियममधील व्हिडिओ व्हायरल
ताबा घेतल्यानंतर छत्रसाल स्टेडियममधील पायऱ्यांवर बसलेला राहुल गांधींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका पायात बूट आणि दुसरा पाय उघडा अशा अवस्थेत दिसत आहेत. या ठिकाणाहून त्यांनी विद्यार्थी प्रश्न आणि देशातील शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करत थेट पंतप्रधानांना आव्हान दिले.

राहुल गांधींच्या ३ प्रमुख मागण्या:
व्हायरल व्हिडिओत बोलताना राहुल गांधी म्हणाले, "विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेल्या मुद्द्यावर संसदेत चर्चा टाळली जात आहे." त्यांनी सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या:

1.     केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा.

2.     आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा छळ करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी व विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत.

3.     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांची माफी मागून शिक्षण आणि परीक्षा पद्धतीत तातडीने सुधारणा करावी.

हायव्होल्टेज ड्रामा अन् सोनिया गांधींची पोलीस ठाण्यात भेट
पंतप्रधान निवासस्थानाबाहेर (७, लोक कल्याण मार्ग) झालेल्या आंदोलनादरम्यान प्रियंका गांधी यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते, तर राहुल गांधींना छत्रसाल स्टेडियमवर ठेवले गेले. या घडामोडींनंतर काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी स्वतः नेत्यांना भेटण्यासाठी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचल्या. काही तासांच्या अटकेनंतर राहुल गांधींसह सर्व नेत्यांची सुटका करण्यात आली.