राक्षसी कारभारावर जरांगे पाटलांचा हल्लाबोल; फडणवीस सरकारवर निशाणा, बंगाल निकालावरही संशय
मुंबई (प्रतिनिधी) : देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून भाजपने तीन राज्यात स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन होईल, एवढे संख्याबळ मिळवले आहे. अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्येही भाजपने द्विशतक ठोकत ममता दीदींच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लगावला आहे. भाजपने मोठ्या फरकाने बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, विरोधकांनी देखील भाजपच्या विजयावर एसआरए आणि ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करुन मतचोरी केल्याचं म्हटलं आहे. आता, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही भाजपच्या विजयावर शंका उपस्थित केली आहे. तसेच, राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरूनही संताप व्यक्त करत, फडणवीसांचे सरकार आपटावेच लागेल, असेही म्हटले.

अकलूज येथील सकल मराठा मोर्चाचे समन्वयक धनाजी साखळकर यांच्या आईच्या मृत्यूनंतर जरांगे पाटील यांनी रात्री त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. सध्या राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना हे असले रत्न आपल्याला लाभले आहेत, हे गुंडांना जेलमध्ये एसी लावून देतात आणि मोबाईल फोन देतात. यांच्या काळात गुंडांचे चालणार आहे. फडणवीसांचे सरकार राक्षसी वृत्तीचे असून आता ते आपटावेच लागेल, असे म्हणत जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
ज्याला विचारले ते म्हणतो मी यांना मतदान केले नाही, तरी हे जिंकतात. पश्चिम बंगालमध्ये ममता बाईला पाडले, पण लोक म्हणतात ममताबाई कधीच पडणार नाही. मला पहिल्यांदा वाटायचं काही नसेल पण आता नक्की काहीतरी भानगड आहे, त्यांनी कुठेतरी काड्या खोचून ठेवल्या आहेत, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भाजपच्या पश्चिम बंगाल आणि इतर राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. आता, मनोज जरांगे पाटील यांनीही भाजपच्या विजयावर शंका घेतली आहे.




