बारामतीत काका - पुतण्याची भेट ; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?

बारामतीत काका - पुतण्याची भेट ; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?

पुणे - बारामतीत मोठी राजकीय घडामोड घडताना दिसत आहे. शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी आज शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक भेट दिली. यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, माजी मंत्री राजेश टोपे आणि आ. रोहित पवार यांचीही उपस्थिती होती.

शुक्रवारी महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळवता आले नाही. भाजपने अनेक ठिकाणी अजित पवार यांना बाजूला ठेवत स्वतंत्र रणनिती आखली, त्यामुळे त्यांच्या गटाला मोठा फटका बसला. तसेच समविचारी पक्षांमध्ये मतविभागणी झाल्याने अनेक ठिकाणी उमेदवारांचा पराभव झाला.

याच पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आज झालेल्या या अचानक भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकांत दोघांनाही समाधानकारक यश मिळवता आलेले नाही. या दारुण पराभवानंतर काका - पुतण्या पुन्हा एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालानंतर झालेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे.