नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला!
मुंबई : राज्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज (४ नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणुकीनुसार २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

न्यायालयाने राज्य सरकारला ३१ जानेवारी २०२६ पूर्वी निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांविषयी सविस्तर माहिती दिली.
निवडणूक विशेष -
- मतदान EVM मशीनद्वारे होणार आहे.
- राज्यात एकूण २८८ नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत.
- काही नगरपंचायती दोन सदस्य पद्धतीने विभाजित (Split) असतील.
- एकूण २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत.
- दुबार मतदारांना ‘डबल स्टार’ चिन्हाने ओळखले जाणार आहे.
- अर्ज दाखल करताना जात प्रमाणपत्र आवश्यक, तसेच ६ महिन्यांच्या आत जात पडताळणी करणे बंधनकारक.
- यंदा १५ नवीन नगरपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे.
- मतदार यादी ७ नोव्हेंबरला प्रसिद्ध,
- अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर,
- तर अर्ज माघारीची मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत राहील.
राज्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या या निवडणुका स्थानिक पातळीवरच्या राजकीय समीकरणांना नवा कलाटणी देण्याची शक्यता आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक -
नामनिर्देशन दाखल - १० नोव्हेंबरपासून
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - १७ नोव्हेंबर
अर्ज छाननी - १८ नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - २१ नोव्हेंबर
निवडणूक चिन्हांचे वाटप - २६ नोव्हेंबर
मतदान - २ डिसेंबर
मतमोजणी - ३ डिसेंबर




