महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जागतिक दर्जाचे कर्करोग उपचार मिळणार; 'महाकेअर'च्या पहिल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जागतिक दर्जाचे कर्करोग उपचार मिळणार; 'महाकेअर'च्या पहिल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकाला कर्करोगाचे वेळेत निदान आणि जागतिक दर्जाचे उपचार मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे 'महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन' (महाकेअर) कंपनीच्या संचालक मंडळाची पहिली बैठक पार पडली. आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्य-शासित (एल २ आणि एल ३) कर्करोग रुग्णालयांच्या माध्यमातून राज्यातील कर्करोग निर्मूलनासाठी ही कंपनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

नागपूरमध्ये 'सायक्लोट्रॉन' प्रकल्पास मान्यता आणि १०० कोटींचा निधी

या बैठकीत 'महाकेअर' अंतर्गत नागपूर येथे 'नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट' या उपकंपनीची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली. कर्करोग उपचाराला गती देण्यासाठी आणि कंपनीच्या कॉर्पस निधीसाठी 'महात्मा फुले जनआरोग्य योजने'तून १०० कोटी रुपये देण्यास तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय, सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) उभारणे, मुंबईतील जी.टी. रुग्णालय इमारतीत महाकेअरच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणे, तसेच लेखापरीक्षक, कंपनी सचिव आणि सल्लागारांची नियुक्ती करणे अशा विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.

टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबत तांत्रिक करार

राज्यातील कर्करोग रुग्णांना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी या बैठकीत 'टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल'सोबत तांत्रिक सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. टाटा मेमोरियलचे प्रतिनिधी खत्री आणि महाकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय चंदनवाले यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या महत्त्वाच्या बैठकीला आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ.पी. गुप्ता, सचिव विकासचंद्र रस्तोगी, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव निपुण विनायक, वैद्यकीय शिक्षण सचिव धीरज कुमार उपस्थित होते. तसेच आरोग्य आयुक्त संजय काटकर, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, महाकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय चंदनवाले, मानद सल्लागार डॉ. कैलास शर्मा, नवीन खत्री आणि उपसचिव संदीप ढाकणे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.