संसद मोर्च्यानंतर NEET वादावर मोदींची भूमिका स्पष्ट; पेपर लीक करणाऱ्यांना कठोर शिक्षा
मुंबई (प्रतिनिधी) : CJP च्या संसद मोर्च्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NEET पेपर लीक प्रकरणावर प्रथमच सार्वजनिक भूमिका मांडली आहे. एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू देणार नाही. पेपर लीक प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.

पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, पेपर लीक हा राजकारणाचा विषय नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित गंभीर मुद्दा आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पुनर्परीक्षा घेण्यात आली आणि ती यशस्वीपणे पार पडली, असेही त्यांनी नमूद केले. तसेच, या प्रकरणात सरकारने तातडीने कारवाई केल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकार संवेदनशील असल्याचा पुनरुच्चार केला.
मोदी म्हणाले की, पेपर लीक रोखणे ही केवळ केंद्र सरकारची जबाबदारी नसून सर्व राज्यांनी आणि संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक प्रभावी व्यवस्था उभारली जाईल, असेही त्यांनी आश्वासन दिले.
दरम्यान, CJP ने संसदेकडे मोर्चा काढला होता. या आंदोलनात अनेक विरोधी पक्षांचे खासदारही सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान काही ठिकाणी तणाव निर्माण झाल्याने दिल्ली पोलिस आणि RAF यांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी लाठीचार्ज तसेच अश्रुधुराचा वापर केल्याची माहिती समोर आली.
यानंतर CJP चे प्रतिनिधी सौरव दास आणि आशुतोष राकां यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. दोन्ही बाजूंमध्ये दोन फेऱ्यांत चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही. मात्र, नड्डा यांनी आंदोलन मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
चर्चेदरम्यान नड्डा यांनी आंदोलनकर्त्यांकडून त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली आणि त्या लिखित स्वरूपात सादर करण्यास सांगितले. त्यानुसार CJP च्या प्रतिनिधींनी सायंकाळी सुमारे ४ वाजता आपल्या मागण्यांचे निवेदन केंद्रीय मंत्र्यांकडे सुपूर्द केले.




